कोल्हापूर : जिल्'ातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शालेय पोषण आहाराच्या दर्जाची आता कधीही तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे नूतन शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रोज सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहाराचा नमुना शिल्लक ठेवण्याचे आदेश सर्व शाळांना देण्यात आले आहेत.
शाळांमध्ये दिल्या जात असलेल्या पोषण आहाराचा दर्जा चांगला नसल्याची बाब यादव यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांच्याशी चर्चा करून याबाबत दोघांच्या सहीने परिपत्रक काढले आहे.जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, शिक्षण सभापती व समिती सदस्य यांच्याकडून या पोषण आहाराची कधीही तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आहाराचा नमुना सायंकाळी पाच वाजेपर्यंत शाळेतच ठेवणे बंधनकारक राहणार आहे. आहाराचा दर्जा चांगला नसेल तर संबंधित ठेका रद्द करण्यात येणार आहे. आहारामध्ये वापरण्यात येणारा भाजीपाला, फळे, तांदूळ, कडधान्ये, तेल, पीठ या साहित्याचा दर्जा चांगला असणे आवश्यक आहे.
स्वयंपाकासाठीची भांडी स्वच्छ असावीत. परिसरामध्येही स्वच्छता असावी. पिण्यासाठीचे पाणी स्वच्छ व निर्जंतुक असावे. स्थानिक शिक्षण समिती सदस्यांनीही आहार संध्याकाळपर्यंत ठेवला आहे किंवा नाही याची खात्री करावी. तो सायंकाळी पाचनंतर नष्ट करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहणार आहे. या एकूणच सर्व प्रक्रियेची जबाबदारी मुख्याध्यापकांवर निश्चित करण्यात आली आहे.
शालेय पोषण आहाराच्या दर्जाबाबत बहुतांश जिल्हा परिषद सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचा पोषण आहार मिळावा, तेथे स्वच्छता असावी, यासाठी कधीही तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शालेय पोषण आहाराचा दर्जा चांगला राहण्यासाठी मदत होईल.- प्रवीण यादवसभापती, शिक्षण समिती, जिल्हा परिषद, कोल्हापूर