कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत सत्ता कुणाची यासाठी दोन्ही काँग्रेससह शिवसेना व भाजपमध्ये आज, मंगळवारी झुंज होत आहे. राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी सर्वस्व पणाला लावले आहे. ग्रामीण मतदार सत्तेच्या चाव्या नेमक्या कुणाच्या हातात देणार आहे, यावर अधिकृत शिक्कामोर्तब आज होणार आहे. जिल्हा परिषदेच्या ६७ आणि पंचायत समितीच्या १३४ जागांसाठी ९0५ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, २४५१ केंद्रांवर मतदान होईल. त्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. केंद्र आणि राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर कधी नव्हे ते शिवसेना आणि भाजपने ग्रामीण राजकारणामध्ये बस्तान बसवण्यासाठी दमदार प्रवेश केल्याने कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यतील याआधीच्या राजकीय लढाया या प्रामुख्याने कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये झाल्या. त्या त्यावेळी ज्याच्याशी जमेल त्याला सोबत घेऊन सत्तास्थाने उपभोगण्यात आली. मात्र, यंदाच्या या निवडणुकीत भाजपने ताराराणी आघाडी आणि जनसुराज्यला सोबत घेऊन आव्हान दिल्याने दोन्ही कॉँग्रेसबरोबरच शिवसेनाही तेवढ्याच ताकदीने रणांगणात उतरली आहे. स्वाभिमानीलाही आपला बालेकिल्ला शाबूत ठेवतानाच आणखी काही जागांचे दान पदरात पाडून घ्यायचे आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता हस्तगत करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक आणि माजी मंत्री विनय कोरे यांना सोबत घेऊन जोडणी घातली असताना राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ आणि कॉंग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनीही तोडीस तोड भूमिका घेतली आहे. अशातच शिवसेनेनेही आक्रमक भूमिका घेत भाजपलाही धक्का देण्याची चांगली तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांनी कोणतेही विधीनिषेध न बाळगता वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये वेगवेगळी भूमिका घेतल्यामुळे निकालाचा अंदाजही वर्तवणे कठीण बनले आहे.बंडखोरांना तगड्या पक्षांचे पर्यायसर्वच बाजूंनी तयार असलेले कार्यकर्ते आता नेत्यांच्या मुलांसाठी पुन्हा पाच वर्षे थांबायला तयार नसल्याचेही या निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आले असून, ही बंडखोरी नेत्यांची डोकेदुखी ठरली आहे. अनेकांना शिवसेना, भाजपच्या रूपाने तगडे पक्ष उमेदवारीसाठी मिळाल्यानेही जिल्ह्यात सर्वत्रच अटीतटीचे वातावरण आहे. शिवसेना - भाजपमध्ये मुंबई महापालिकेच्या निमित्ताने सुरू झालेल्या उघड संघर्षाचाही परिणाम कोल्हापूर जिल्ह्यात अटळ मानला जात आहे. जिल्ह्यात २४५१ मतदान केंद्रेजिल्ह्यात २४५१ मतदान केंद्रे असून, यापैकी ११८ संवेदनशील, ३० अतिसंवेदनशील मतदान केंद्रे आहेत. निवडणुकीसाठी १६,१७६ मतदान कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये २६९६ केंद्राध्यक्ष, २६९६ पहिला मतदान अधिकारी, ८०८८ इतर मतदान अधिकारी, २६९६ शिपायांचा समावेश आहे. या निवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी ६७ गटांसाठी ३२२ उमेदवार तर पंचायत समितीच्या १३४ गणांसाठी ५८३ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी एकूण २१,३८,०८० मतदार आहेत. त्यापैकी पुरुष-११,१२,३०२, स्त्री- १०,२५,७६७, इतर-११ मतदारांचा समावेश आहे. निवडणुकीसाठी ६१८१ मतदान यंत्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत.
उमेदवारांची परीक्षा!
By admin | Published: February 21, 2017 1:24 AM