कोल्हापूर : ‘महावितरण’साठी काम करणाऱ्या प्रत्येक जनमित्रांची (लाईन स्टाफ) आरोग्य तपासणी करून त्यांच्यासाठी विमाकवच वाढविण्याची मागणी इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशनच्या कोल्हापूर परिमंडलाचे अध्यक्ष मनोज बगणे यांनी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांकडे केली आहे.कोरोना विषाणूमुळे जिल्ह्यात संचारबंदी असतानाही सामान्य ग्राहकांच्या घरातील वीज खंडित होऊ नये यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात महावितरणचे ३५०० कर्मचारी अखंड सेवा देत आहेत. महावितरणमधील वाहिनी कर्मचारी यासाठी कर्तव्यावर असून वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी ते आपल्या जिवाची बाजी लावून दक्ष आहेत.कोरोना विषाणूचे थैमान सुरू असताना आपला जीव धोक्यात घालून प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात काम करीत असलेल्या या प्रत्येक जनमित्राची शाखा कार्यालय आणि उपविभागीय कार्यालयामध्ये आरोग्य तपासणी करावी आणि त्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम घ्यावेत, अशी मागणी असोसिएशनने मुख्य अभियंत्यांकडे केली आहे.जिल्ह्यातील जनमित्र ग्राहकांची तक्रार निवारण करण्यासाठी प्रत्येक ग्राहकापर्यंत जात असतो; त्यामुळे कोरोना या विषाणूचा त्याला कोठेही संसर्ग होऊ शकतो. ज्या विजेच्या खांबाला एखाद्या संशयित कोरोनाग्रस्ताने हात लावला असेल आणि त्याच पोलवरील तक्रारीचे निवारण करण्यासाठी कर्मचारी जात असेल, तर कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याची तपासणी करण्याची आणि आणि त्याच्या विम्याची रक्कम वाढवून ५० लाख करण्याची मागणीही असोसिएशनने केली आहे.