कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे शिवाजी विद्यापीठअंतर्गत सोमवारी होणारी परीक्षा स्थगित करण्यात आली होती. परंतु, पावसाचा जोर कायम राहिल्याने आज, मंगळवार व उद्या, बुधवार या दोन दिवसांच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिली. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. परिणामी, वाहतुकीस अडथळा येत असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेला येण्यास त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थीहित लक्षात घेता शिवाजी विद्यापीठाने आज, मंगळवार आणि उद्या, बुधवारी होणाऱ्या सर्व विषयांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. पुढे ढकललेले पेपर कधी होणार या संदर्भातील माहिती यथावकाश शिवाजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. तरी महाविद्यालय व विद्यार्थ्यांनी पेपर पुढे ढकलले आहेत, याची नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षा विभागाकडून करण्यात आले.
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी; शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 5:46 PM