कोल्हापूर : मेकॉले यांनी सुरू केलेली ‘घोका आणि ओका’ ही शिक्षणपद्धती सोडून ‘नई तालीम’ या गांधी विचारांच्या शिक्षणाची कास धरा, असे आवाहन प्रा. आनंद मेणसे यांनी रविवारी येथे केले.चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत येथील शाहू स्मारक भवनातील कलादालनात भरविण्यात आलेल्या सेवाग्राममधील विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या गांधी विचारांच्या ‘नई तालीम’ विचारावर आधारित चित्रे आणि लिखाणाच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. मेणसे यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प वाहून या प्रदर्शनाचे उद्घाटन केले.
कोल्हापुरात शाहू स्मारक भवन येथील कलादालनात प्रा. आनंद मेणसे यांनी महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस गुलाबपुष्प वाहून चिल्लर पार्टीच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी संजय हळदीकर, मिलिंद नाईक उपस्थित होते. (छाया : दीपक जाधव)
मेणसे यांनी आपल्या भाषणात नई तालीम शिक्षणाचा विचार आजही सुरू ठेवण्याची गरज असल्याचे सांगून ‘चिल्लर पार्टी’ने हा विचार पुढे नेण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले असल्याचे सांगितले. जो शिकतो त्याला श्रमाधिष्ठित शिक्षण मिळाले पाहिजे, या विचारातून गांधीजींनी हा प्रयोग केला.
दुर्दैवाने क्लार्क निर्माण करणारी ब्रिटिशांचीच शिक्षण पद्धती आजही आपण अंगिकारली आहे. ही घोकंपट्टीची पद्धत फेकून देऊन मातृभाषेतून सभोवताली उपलब्ध असणारी व्यवसायाभिमुख शिक्षणपद्धती स्वीकारली पाहिजे, असे मत मेणसे यांनी व्यक्त केले.
गांधीजींनी उद्योग, पर्यावरण, शेतीबरोबरच शैक्षणिक विचारही मांडला, जो आजही सुसंगत आहे. आजचे शिक्षण दुचाकी दुरुस्त करणे, गाईचे दूध काढणे, शेती करणे यासारखे व्यावहारिक शिक्षण देते काय, हा सवाल विचारला पाहिजे. व्हॉट्स अॅपच्या भ्रष्ट आणि चुकीच्या भाषेतून व्यक्त होणाऱ्या नव्या पिढीला गांधीजींच्या या कृतिशिक्षणाची ओळख करून देणे गरजेचे आहे. प्रत्येक भाषेतून माणसे जोडली जातात, त्यासाठी ‘जग बघा, पुन्हा परत या, देश समजून घ्या,’ असा संदेश गांधीजींनी दिला होता, तो व्यवहारात आणा, असेही मेणसे म्हणाले.या चित्रप्रदर्शनाचे संकल्पक संजय हळदीकर यांनी सेवाग्राममध्ये अनुभवलेले प्रसंग सांगितले. ‘नई तालीम’च्या शैक्षणिक विचारातून काम मिळते, हे तेथील ‘आनंद निकेतन’ शाळेतील विद्यार्थ्यांनी चित्रांच्या आणि लिखाणातून मांडले आहे. ते अनुभवण्यासाठी या चित्रप्रदर्शनाला भेट द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमात प्रशांत पितालिया यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. चिल्लर पार्टीने प्रकाशित केलेल्या ‘पोरांचा सिनेमा’ हे पुस्तक यावेळी पाहुण्यांना भेट देण्यात आले. प्रदर्शनाचे समन्वयक मिलिंद कोपार्डेकर यांनी प्रास्ताविक केले; तर मिलिंद नाईक यांनी आभार मानले.गांधी फॉर टुमारो पथनाट्याचे सादरीकरणप्रारंभी संजय हळदीकर यांनी दिग्दर्शित केलेल्या गांधी फॉर टुमारो या पथनाट्याचे सादरीकरण झाले. शिवाजी मराठा हायस्कूलच्या आदित्य सावंत, समीक्षा लोंढे, सुप्रीत कांबळे, सुजल कांबळे, राजनंदिनी सावंत, अनिता जाधव, पूजा पाटील, शिवराज कांबळे, करीना गळवे या विद्यार्थ्यांनी हे पथनाट्य सादर केले. या समारंभास बेळगावचे ए. बी. जाधव, मिलिंद यादव, अभय बकरे, पद्मश्री दवे, शिवप्रभा लाड, सलीम महालकरी, अनिल काजवे, विजय शिंदे, रवींद्र शिंदे, आदी उपस्थित होते.प्रदर्शन १३ मार्चपर्यंतहे प्रदर्शन १३ मार्चपर्यंत शाहू स्मारक भवनातील कलादालनात सकाळी १0 ते रात्री ९ या वेळेत खुले राहणार आहे.