कोल्हापूर : गुजरीतील एका सराफाकडून दहा ग्रॅम सोने खरेदी केले. मात्र, सराफाकडून तीस ग्रॅम सोने देण्यात आले. ही बाब लक्षात येताच ग्राहक साईप्रसाद शेलार यांनी ते प्रामाणिकपणे परत केले. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
संभाजीनगरातील महापालिका व्यायामशाळेचे प्रशिक्षक असलेले साईप्रसाद यांनी गुजरी येथील सोन्याचे घाऊक व्यापारी विनोद अग्रवाल यांच्याकडून तीन दिवसांपूर्वी दहा ग्रॅम सोने खरेदी केले होते. दैनंदिन कामकाजाच्या गडबडीत अग्रवाल यांनी शेलार यांना दहा ग्रॅमऐवजी तीस ग्रॅम सोने दिले. ही बाब शेलार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रविवारी जादाचे २० ग्रॅम सोने अग्रवाल यांना प्रामाणिकपणे परत केले. परत केलेल्या सोन्याची किंमत एक लाख रुपये आहे. याबद्दल शेलार यांचा कोल्हापूर सराफा व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड, माजी नगरसेवक किरण नकाते, विनोद अग्रवाल, निहाज नदेकर, मनोज बहिरशेट, संतोष नष्टे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.