करंजफेण : विक्रम पाटील
निसर्ग विविधतेने नटलेल्या पन्हाळा तालुक्यात अनेक ठिकाणी गौण खनिजाचे बेकायदेशीपणे उत्खनन होत आहे. या प्रकाराकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने निसर्गप्रेमींच्या मधून नाराजी व्यक्त होत आहे.
पन्हाळा तालुक्यात बाजार भोगाव, कळे, पडळ, कोतोली, कोडोली, पन्हाळा,
वाडी रत्नागिरी अशा सात मंडल कार्यालयाच्या अधिपत्याखाली महसूल विभागाचे एकूण १३३ गावांचे कामकाज चालते. मात्र, गावांच्या तुलनेत महसूलच्या रुपाने शासनाच्या तिजोरीत तुटपुंजी रक्कम जमा झाली आहे.
तालुक्यातील अनेक गावांच्या मुख्य रस्त्याशेजारी असलेल्या सरकारी अगर निमसरकारी जागेतील मुरूम तसेच नदीकाठची माती दिवसाढवळ्या व मध्यरात्रीची संधी साधून चोरून उत्खनन करून लुटीचा राजरोसपणे धंदा सुरू आहे. तीनशे ते पाचशे रुपये दराने मुरूम तर एक हजार ते पंधराशे रुपये दराने नदीकाठच्या मातीच्या ट्राॅलीची विक्री केली जाते.त्यातून शासनाला मिळणारा लाखोचा महसूल बुडवून तालुक्यात राजरोसपणे खुलेआम गौण खनिजाच्या लुटीचा व्यवसाय सुरू असून देखील महसूल विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
जागोजागी रस्त्याच्या बाजूला बुसुमारपणे मुरूम खोदाई केल्याने निसर्गाचे विद्रूपीकरण झाले असून नदीकाठच्या माती उत्खनन केल्यामुळे नदी पात्र बदलण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे शासनाचे नियम पायदळी तुडवणाऱ्यांच्यावर नागरिकांच्यातून कारवाई करण्याची मागणी होत आहे. अनेक ठिकाणी जैवविविधतेला हानी पोहोचवून खोदाई झाल्याचे दिसत असून यामुळे निसर्गाच्या सौंदर्याला हानी पोहोचत असल्याने निसर्गप्रेमींच्यामधून देखील नाराजी व्यक्त होत आहे.
फोटो : पन्हाळा तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्याच्या शेजारी बेकायदेशीर डोंगर खोदाई करून मुरूम नेण्यात आला आहे. चौकट
विनापरवाना उत्खनन कोणी करीत असेल त्याची चौकशी केली जाईल व त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील. रात्रीच्या वेळी चोरून वाहतूक करणाऱ्या वाहनांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात येईल.
रमेश शेंडगे
तहसीलदार, पन्हाळा