सेनापती कापशी : शेती हाच शाश्वत तरणोपाय आहे. देशाच्या आर्थिक विकासाचा दर हा कृषिक्षेत्रावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त पीक काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पाण्याचा अतिवापर हा शेतीसाठी धोकादायक आहे. शेतकऱ्यांनी स्वयंचलित ठिबक यंत्रणेचा वापर करावा. त्यासाठी अनुदान मिळवून देण्याचा मी प्रयत्न करीन, असे आश्वासन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. हसूर बुद्रुक (ता. कागल) येथे कृषी विभाग व सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना यांच्यातर्फे आयोजित स्वयंचलित ठिबक प्रणाली तसेच शेती व्यवस्थापन ॲपच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने, जनरल मॅनेजर संजय शा. घाटगे, जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर वाकुरे, अंकुर फार्मासिसचे गिरीश कुलकर्णी, आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी युवराज पाटील, शशिकांत खोत, अंकुश पाटील, ‘समन्यायी’चे आनंदराव पाटील उपस्थित होते.
शेतीवर प्रेम
मुश्रीफ म्हणाले, वडिलांच्या मृत्यूनंतर ५० एकर शेतीची जबाबदारी दहा वर्षे माझ्यावर होती. मी स्वतः हाडाचा शेतकरी आहे. शेतात मी वाकुरी मारलेली असून पाण्यासाठी नदीत खड्डेही खोदायचो. मी शेतीवर मनापासून प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. अलीकडच्या काळात मला शेतात जाता येत नाही. माझ्या शेतीची जबाबदारी माझी पत्नी बघते.
०७ हसूर
फोटो : हसुर बुद्रुक (ता. कागल) येथे स्वयंचलित ठिबक, कृषी पर्यटन व शेती व्यवस्थापन ॲपचे लॉंचिंग करताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ. यावेळी भय्या माने, युवराज पाटील, शशिकांत खोत, गिरीश कुलकर्णी, ज्ञानेश्वर वाकुरे, आदी उपस्थित होते.