कोल्हापूर : हीरकमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या प्रगतीसाठी माजी विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी, आदी प्रत्येक घटकाने सूचनांसह पाठबळ द्यावे. आपली भूमिका निभावावी. विद्यापीठाचा संशोधन क्षेत्रातील लौकिक अधिक उंचावण्यासाठी शिक्षक, विद्यार्थ्यांनी सवर्तोपरी योगदान द्यावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी बुधवारी येथे केले.विद्यापीठाचा ५८वा वर्धापनदिन कोविडच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या प्रांगणात सकाळी साडेआठ वाजता कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते विद्यापीठाच्या ध्वजाला वंदन करण्यात आले. यावेळी संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिवपुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कुलगुरू डॉ. शिर्के यांनी ऑनलाईन संवाद साधला.
कोविडने आपल्यातील क्षमता व मर्यादांची जाणीव करून दिली आहे. ऑनलाईन अध्ययन-अध्यापन प्रणालीपासून सुटका होऊन प्रत्यक्ष अध्यापन प्रक्रियेस लवकर सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोग आणि शासन यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपल्याला टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया राबवावयाची असल्याचे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी. आर. पळसे, डॉ. आर. के. कामत, एस. एस. महाजन, पी.आर. शेवाळे, ए. एम. गुरव, एम. एस. देशमुख, आर. व्ही. गुरव, नमिता खोत, पी. टी. गायकवाड, अभय जायभाये, आदी उपस्थित होते.शिव वार्ताचे लोकार्पणवर्धापनदिनाच्या निमित्ताने मुख्य प्रशासकीय इमारत, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असणारा उद्यान परिसर या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दरम्यान, विद्यापीठाच्या ह्यशिव वार्ताह्ण या यूट्यूब चॅनलचे लोकार्पण कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले.