कोल्हापूर : घरोघरी ख्रिसमस ट्रीची सजावट, आकर्षक विद्युत रोषणाई, केक-चॉकलेटस्ची धूम, सांताक्लॉजची वेशभूषा, आकर्षक गिफ्ट पॅकिंग, नाताळची गाणी... अशा विविध तयारीसाठी नाताळ पूर्वसंध्येला ख्रिस्ती बांधवांची लगबग सुरू होती. आपल्या कुटुंबातील लहानग्यांसाठी सांताक्लॉज बनून पालकांनीही भेटवस्तूंची खरेदी केली. नाताळ हा ख्रिस्ती बांधवांचा वर्षातील सर्वांत मोठा सण. प्रेषित येशूंचा जन्मदिन म्हणून तो साजरा केला जातो. यानिमित्त घरोघरी ख्रिसमस ट्री सजविले जाते. त्यावर विद्युत रोषणाईच्या माळा, बेल, ग्रीटिंग्ज लावली जातात. याशिवाय घरांना झुरमुळ्या, सांताक्लॉजच्या कटआउटने सजवले जाते. मध्यरात्री नाताळच्या गाण्यांवर नृत्य केले जाते आणि सकाळी विविध चर्चमध्ये प्रार्थनासभांचे आयोजन केले जाते. यानिमित्त सणाच्या पूर्वसंध्येला पापाची तिकटी येथे ख्रिसमस ट्री, केक-चॉकलेट्स, आप्तेष्टांना देण्यासाठी आकर्षक गिफ्टस्ची खरेदी केली जात होती. तसेच घरोघरी सजावट करण्यात येत होती. नाताळनिमित्त न्यू शाहूपुरीतील वायल्डर मेमोरियल चर्च, नागाळा पार्क येथील ख्राईस्ट चर्च, रेसिडेन्सी क्लब येथील आॅल सेंट चर्च, होली क्रॉस चर्च, विक्रमनगर येथील चर्च तसेच ब्रह्मपुरी येथील पवित्र उपासना मंदिर या चर्चमध्ये प्रार्थनासभांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या, गुरुवारी न्यू शाहूपुरीतील वायल्डर मेमोरियल चर्च येथे सकाळी आठ ते साडेनऊ या वेळेत इंग्रजी उपासना, पावणेदहा ते सकाळी अकरा या वेळेत पहिली मराठी उपासना, सव्वाअकरा ते साडेबारा दुसरी मराठी उपासना, साडेबारा ते पावणेदोन या वेळेत तिसरी मराठी उपासना होणार आहे. चर्च पास्टर्स डी. बी. समुद्रे, जे. ए. हिरवे हे विशेष प्रार्थना व संदेश देतील.
नाताळच्या पूर्वसंध्येला उत्साह
By admin | Published: December 24, 2014 11:54 PM