कोल्हापूर : दोन दिवसांच्या अंतराने तब्बल ५१ जण कोरोनाबाधित झाल्याने बालकल्याण संकुलामध्ये अस्वस्थता पसरली आहे. सर्व ती काळजी घेऊनही लहानग्यांच्या वाट्याला कोरोनाचे जीवघेणे उपचार आल्याने आता सुरक्षिततेच्या उपाययोजनांची फेररचना करण्याची गरज निर्माण झाली आहे. आपले सहकारी कोरोनाग्रस्त झाल्याचे पाहून संकुलातील मुले, कर्मचारी भेदरले आहेत.
बालकल्याण संकुलामध्ये समाजातील अनाथ, निराधार, गोरगरिबांची बालके वास्तव्यास असतात. आजच्या घडीला २५० मुले-मुली तेथे आहेत. सरकारी अनुदानासह समाजातील दानशुरांच्या मदतीवर ही संस्था चालविली जाते. कोरोनाची साथ गेल्या वर्षी आल्यापासून तेथे एकही रुग्ण आढळला नव्हता; पण कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत मात्र एकापाठोपाठ एक अशी २५० पैकी ४७ मुले मुली पॉझिटिव्ह आढळली. या मुलांची काळजी घेणाऱ्या चौघा कर्मचाऱ्यांनाही कोरोनाने गाठले.
या सर्वांवर उपचार सुरू आहेत. फारशी लक्षणे नसल्याने काळजी करण्याचे कारण नाही; पण कोरोनाने शिरकाव करीपर्यंत येथील यंत्रणा काय करीत होती, असा प्रश्न पुढे येत आहे. संकुल प्रशासनाच्या म्हणण्यानुसार सर्व प्रकारची खबरदारी घेतली गेली होती. बाहेरून येणाऱ्यांच्या सॅनिटायझेशनसह कपडे बदलूनच आत प्रवेशाचा कडक नियम केल्याचे सांगण्यात येत आहे; पण एक चूक सगळ्या प्रयत्नांवर कशी पाणी फिरवते, ते यानिमित्ताने बालकल्याण संकुलाला अनुभवता आले. ६ ते १८ वयोगटातील तब्बल ४७ मुले-मुली व ४ कर्मचारी असे ५१ जण कोरोनाग्रस्त होऊन दवाखान्यात पोहोचले आहेत.
या मुलांचे स्राव तपासणीसाठी दिल्यानंतर त्याचा अहवाल हातात पडायला दोन दिवस लागले. या दोन दिवसांत स्राव दिलेली मुले व कर्मचारी एकत्रच संकुलात राहत होती. निदान स्रावाचा अहवाल हाती येईपर्यंत तरी विलगीकरण आवश्यक होते; पण त्याबाबतीतही हलगर्जीपणा झाल्याचे दिसत आहे. बुधवारी (दि. १२) रिपोर्ट आल्यानंतर रात्रीच ३७ जणांना रुग्णालयात हलविण्यात आले. तोपर्यंत स्वॅब निगेटिव्ह आलेली मुलेही या पॉझिटिव्ह मुलांसमवेतच होती. त्यामुळे तीन दिवस पॉझिटिव्ह रुग्णांच्या थेट संपर्कात ही मुले आली असल्याने पुुन्हा स्राव घेणार की नाही याबाबतीत संकुल प्रशासनाकडून काही सांगण्यात आलेले नाही.
चौकट
...तरच संसर्गाचा धोका टळणार
कोरोनाचा शिरकाव होण्यासाठी पोक्सो कायद्यांतर्गत येणाऱ्या मुलीच कारणीभूत ठरल्याचा प्राथमिक निष्कर्ष गृहीत धरून संकुलाच्या प्रशासनाने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पोक्सोच्या मुली तपासणीशिवाय इकडे पाठवू नयेत, असे विनंती केली आहे. पोलीस प्रशासनाने ते मान्य केले तर भविष्यातील आणखी संसर्गाचा धोका टळणार आहे.