कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, माजी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, माजी अधिष्ठाता डॉ. पी. डी. राऊत, नॅनो सायन्स अधिविभागप्रमुख डॉ. पी. एस. पाटील आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. डी. जी. कणसे यांचा कुलगुरुपदासाठी विचार करू नये, अशी मागणी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघा (सुटा)ने केली.
या पाचजणांनी विविध प्रकरणांमध्ये नियमबाह्य आणि बेकायदेशीर कामकाज केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्याबाबतचे पत्र सुटाने कुलपती भगतसिंह कोश्यारी, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि कुलगुरू शोध समितीचे संपर्क अधिकारी आर. के. जैन यांना पाठविले आहे. कुलगुरू निवडीच्या पार्श्वभूमीवर सुटाच्या या लेटरबॉम्बने विद्यापीठाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.सध्या विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी विद्यापीठ कॅम्पसवरून १४ जणांनी अर्ज केले आहेत. त्यामध्ये डॉ. नांदवडेकर, शिर्के, राऊत, पाटील, कणसे यांचा समावेश आहे. त्यांतील शिर्के यांनी प्र-कुलगुरुपदावर काम करताना विद्यापीठाच्या कायद्याचे उल्लंघन करून काम केल्याची माहिती सुटाने या पत्राद्वारे दिली आहे. नांदवडेकर यांनी बेकायदेशीर काम केले आहे.
राऊत यांनी अधिष्ठातापद हे बेकायदेशीरपणे घेतले आहे. कणसे यांनी एका महाविद्यालयाला झालेला दंड नियमबाह्यपणे कमी केला आहे. पाटील यांनी विद्यापीठाच्या नियमांचे उल्लंघन करून स्वतःच्या मुलाला पीएच.डी.ला प्रवेश दिल्याचा आरोप करीत त्याची माहिती दिली आहे. या कारणांमुळे संबंधित पाचजणांचा कुलगुरुपदासाठी विचार करण्यात येऊ नये, अशी मागणी सुटाने या पत्राद्वारे केली आहे.
या पाचजणांबाबत दिलेल्या माहितीची आवश्यक कागदपत्रेही पाठवून देण्याची तयारी ह्यसुटाह्णने दर्शविली आहे. दि. ११ जुलैला पाठविलेल्या या पत्रावर ह्यसुटाह्णचे जनरल सेक्रेटरी प्रा. डॉ. डी. एन. पाटील यांची स्वाक्षरी आहे. दरम्यान, याबाबत डॉ. नांदवडेकर यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा मोबाईल संपर्क क्षेत्राच्या बाहेर होता.
नियमबाह्य आणि बेकायदेशीर कारभार केलेल्या व्यक्तीची कुलगुरुपदावर निवड झाल्यास विद्यापीठाच्या लौकिकास बाधा पोहोचणार आहे. ते टाळण्यासाठी आम्ही हे पत्र कुलपती, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, कुलगुरू शोध समितीला पाठविले आहे. हे पत्र पाठविण्याचा निर्णय सुटाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.- डॉ. डी. एन. पाटील, जनरल सेक्रेटरी, सुटा
आरोप झालेल्यांचे म्हणणेडॉ. शिर्के- प्र-कुलगुरू म्हणून काम करीत असताना सर्व प्रकारची प्रशासकीय कामे ही नियमाप्रमाणे आणि कायद्यानुसार केली आहेत. त्यामुळे गेल्या तीन वर्षांमध्ये सर्वच घटकांना न्याय देता आला.डॉ. राऊत- अधिष्ठाता पदावरील माझ्या नियुक्तीस कुलपतींनी मान्यता दिली होती. प्र-अधिष्ठाता म्हणून आंतरविद्याशाखेत येणाऱ्या सर्व विषयांना न्याय दिला आहे. त्याबाबत कोणतीही तक्रार नाही.डॉ. कणसे- संबंधित महाविद्यालयाच्या दंडाबाबतची कार्यवाही निर्णय माझा वैयक्तिक नव्हता. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत त्याबाबत निर्णय झाला होता. त्यानुसार आणि नियमाप्रमाणे मी काम केले आहे.डॉ. पाटील- विभागातील पीएच. डी. प्रवेश प्रक्रिया नियमानुसार राबविली आहे. त्याबाबतची अद्ययावत माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सुटाने केलेले आरोप तथ्यहीन आहेत.