कोल्हापूर : ‘चांगभलं’च्या गजरात पुष्पवृष्टी करत शिवाजी पेठ व परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महाकाली देवीचा पालखी प्रदक्षिणा उत्सव सोहळा मंगळवारी भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. येथील श्री महाकाली तालीम मंडळाच्यावतीने आयोजित सवाद्य पालखी सोहळ्यात भाविक भक्तिभावाने सहभागी झाले होते. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही शिवाजी पेठेतील साकोली कॉर्नर येथे श्री महाकाली देवीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. अक्षयतृतीयेच्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांनी या उत्सवाला प्रारंभ झाला. पंचमीच्या दिवशी शनिवारी नवचंडी यज्ञ व महाप्रसाद केला. मंगळवारी नवमीदिवशी सायंकाळी मंदिरात श्री महाकाली देवीच्या महाआरतीनंतर देवीच्या पालखीचे पूजन भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘श्री महाकाली देवीच्या नावानं चांगभलं’चा गजर करण्यात आला. याप्रसंगी आमदार चंद्रदीप नरके, नगरसेवक अजित ठाणेकर, प्रतापसिंह जाधव, राहुल माने, माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, आदी उपस्थित होते. फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजविलेली श्री महाकाली देवीची पालखी प्रदक्षिणेला साकोली कॉर्नर येथील मंदिरापासून सायंकाळी प्रारंभ झाला. प्रथम मंदिराला प्रदक्षिणा घालून ही पालखी सुर्वेश्वर मंदिरामार्गे राजघाट रोडमार्गे चौपाटी ग्रुप, ताराबाई रोड, साकोली कॉर्नरमार्गे उभा मारुती चौक या मार्गावरून पुन्हा मंदिरात आली. यावेळी प्रदक्षिणा मार्गावर फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. रस्ते आकर्षक रांगोळ्यांनी सजले होते. विविध मंडळांनी ठिकठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. यावेळी फटाक्यांची भव्य आतषबाजी झाली. ‘चांगभलं’च्या गजरात या पालखीवर पुष्पवृष्टी केली जात होती. पालखी सोहळ्यात श्री महाकाली उत्सव समितीचे अध्यक्ष शिवराज सावंत, दीपक माने, विजय कदम, संदीप माने, हेमंत देसाई, महादेव माने, संतोष माने, आदी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विविध वाद्यांनी सजला पालखी सोहळापालखी सोहळ्यात कर्नाटक येथील लोककलेचा प्रकार असलेल्या वीरभद्रया ढोल संबळ वाद्यासोबत करमाळा (सोलापूर) येथील सैराट व फँड्री फेम हलगी, ताशापथक तसेच इस्कॉन येथील हरे राम हरे कृष्ण कीर्तन मंडळाचे वाद्य, परिसरातील मुलींचे लेझीम पथक, लाठी-काठी मर्दानी खेळाडू, आदी सहभागी झाले होते. याशिवाय सोहळ्यात मानाचे उंट, घोडेही सहभागी केले होते.
‘महाकाली’चा पालखी सोहळा उत्साहात
By admin | Published: May 17, 2016 11:57 PM