कोल्हापूर : अश्विन शुद्ध दशमी अर्थात विजयादशमीच्या प्रथेनुसार ऐतिहासिक दसरा चौकात गुरुवारी शाही विजयोत्सव साजरा झाला. शाही लवाजम्यानिशी आलेली करवीरनिवासिनी अंबाबाई तसेच तुळजाभवानीची पालखी, गुरुमहाराजांची पालखी आणि ऐतिहासिक मेबॅक कारमधून आलेले कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत शाहू महाराज, युवराज संभाजीराजे, महाराजकुमार मालोजीराजे, यौवराज शहाजीराजे, यौवराज यशराजराजे, यशस्विनीराजे यांच्यासह सरदार, मानकरी, सरकार अशा घराण्यांतील प्रतिनिधींच्या उपस्थितीत शमीपूजनानंतर बंदुकीच्या फैरी झाडून दिलेली सलामी, आकर्षक आतषबाजीत शाही दसरा सोहळा गुरुवारी पार पडला.करवीरनिवासिनी अंबाबाई देवी, तुळजाभवानी आणि गुरुमहाराज अशा ईश्वरी सत्ता आणि संस्थान यांच्या त्रिवेणी संगमाने झालेल्या या शाही सीमोल्लंघन सोहळ्यात ‘सोने घ्या सोने’ अशा शुभेच्छांच्या वर्षावात हजारोंनी सोने लुटले. गुरुवारी सायंकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी देवी अंबाबाई आणि तुळजाभवानी यांच्या पालख्या आपल्या लवाजम्यानिशी दसरा चौकाकडे प्रस्थानकर्त्या झाल्या. त्यापाठोपाठ गुरुमहाराज यांच्याही पालखीचे प्रस्थान झाले. दरम्यान, श्रीमंत शाहू महाराज, युवराज संभाजीराजे, महाराजकुमार मालोजीराजे, यौवराज शहाजीराजे, यौवराज यशराजराज, यशस्विनीराजे यांचे मेबॅक कारमधून सोहळास्थळी आगमन झाले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, महापौर वैशाली डकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष विमलाताई पाटील, बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा, पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, सरदार घराण्यातील बाबा इंगळे, बंटी यादव, बाळ पाटणकर, दिग्विजय भोसले, विश्वविजय खानविलकर, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, भाजप जिल्हाध्यक्ष महेश जाधव, संजय डी. पाटील, पारस ओसवाल यांच्यासह मानकरी उपस्थित होते.पोलीस बँडने देवीला मानवंदना दिली. श्रीमंत शाहू महाराजांच्या हस्ते देवीची आरती झाल्यानंतर सहा वाजून चार मिनिटांनी बंदुकीच्या फैरी झाडून या शाही सोहळ्याला सलामी दिली. त्यानंतर नागरिकांनी सोने लुटले. छत्रपतींनी मेबॅक कारमध्ये उभे राहून कोल्हापूरकरांकडून सोने व शुभेच्छा स्वीकारल्या. सायंकाळी सात वाजता जुना राजवाड्यात ‘दसऱ्याचा दरबार’ भरविला होता. या सोहळ्यानंतर देवी अंबाबाई, तुळजाभवानी, गुरुमहाराज यांच्या पालख्या लवाजम्यानिशी सिद्धार्थनगर, पंचगंगा नदीघाट, पापाची तिकटी, गुजरीमार्गे रात्री मंदिरात परतल्या.
सीमोल्लंघन सोहळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2015 1:16 AM