कोल्हापूर : दर्जेदार अभिनय, सामाजिक प्रश्नांचे उत्तमरीत्या सादरीकरण आणि नेपथ्य, प्रकाश योजना, ध्वनी व्यवस्था, वेशभूषा अशा एकापेक्षा एक सरस सादरीकरणाने राज्य बालनाट्य स्पर्धेचा आज समारोपाचा दिवस या संघांनी बहारदार सादरीकरणाने गाजविला. शाहू स्मारक भवनमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजित १२ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या शेवटच्या चार स्पर्धक नाटकांचे सादरीकरण रविवारी झाले. त्यामध्ये (याला पर्याय नाही) सेंट झेविअर्स स्कूल, (गणपती बाप्पा हाजीर हो) शिंदे अकॅडमी, (टायरेसियस राजा) वि. स. खांडेकर प्रशाला, (आभाळफूल) विद्यापीठ हायस्कूल या शाळा व संस्थांनी नाटकांचे सादरीकरण केले.आजच्या सादरीकरणात नेपथ्य, वेशभूषा, प्रकाश योजना, नीटनेटके सादरीकरण आणि या सादरीकरणाला प्रेक्षकांतून टाळ्यांच्या स्वरुपात मिळणारी दाद सहभागी बालकलाकारांचे मनोधैर्य उंचावणारी होती. चार संस्थांनी सादर केलेली बालनाटके सहज अभिनयाने सादर केली. उपस्थितांना आशय आणि त्यांचे सादरीकरण मनाला भावणारे होते. या सादरीकरणात ‘गणपती बाप्पा हाजीर हो’ बालनाट्यातील ‘दवंडीवाला टिन्या’ सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. ‘टायरेसीयस राजा’ या नाटकातील वयस्कर मनुष्य, यमदूत, राजकन्या, यक्ष, आदी पात्रे सर्वांच्या पसंतीस उतरली, तर सेंट झेविअर्स स्कूलच्या ‘याला पर्याय नाही’मधील राजा तिरसेटसेन, सेनापती तिरसटसेन, सेनापती विचित्रसेन ही पात्रेही नावांमुळे बालरसिकांच्या मनात घर करून गेली. गेले तीन दिवस सुरू असलेल्या या बालनाट्य स्पर्धेतील नाटकांना बालरसिक व पालकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद बालनाट्य चळवळीला पोषक असाच ठरला. यावेळी परीक्षक मीनाक्षी वाघ, नविनी कुलकर्णी, वामन तावडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)आमचं नाटक हायकाही हौशी पालकांकडून आपल्या पाल्याच्या एंट्रीला मोबाईल, कॅमेऱ्याचे फ्लॅश पाडल्यामुळे सादरीकरणात काही प्रमाणात पालकांच्या आवाजामुळे विस्कळीतपणा येत होता. पाल्याच्या कलेला टाळ्यांची दाद देण्यापेक्षा चित्रीकरणाच्या नावाखाली काही पालकांनी त्याला ‘खो’ घातला. मुलांना डिस्टर्ब करू नका, अशी विनंती संयोजकांनी संबंधित पालकांना केली, तर यावर ‘आमचं नाटक हायं’ अशी दुरुत्तरे पालक करीत होते.
बहारदार सादरीकरणाने समारोप
By admin | Published: January 05, 2015 12:19 AM