कोल्हापूर : जोपर्यंत राज्य सरकार कोरोना काळातील वीजबिल माफ करीत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील. केवळ अधिवेशन पार पाडण्यासाठी सरकार जनतेची भलावण करत असेल, तर एक दिवस महाराष्ट्र बंदची हाक द्यावी लागेल तसेच वीज बिल भरणार नाही, असा इशारा कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी दिला. वीजबिल माफ करावे, या मागणीसाठी कृती समितीच्या मंगळवार पेठेतील विठ्ठल मंदिरात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
साळोखे म्हणाले, राज्य शासनाने उन्हाळी अधिवेशन व्यवस्थित पार पाडण्यासाठी कोरोना महामारी काळातील सहा महिन्यांचे वीजबिल वसुलीसाठी स्थगिती दिली आहे. टोलमाफीसारखे लाॅलिपाॅप देऊन जनतेची भलावण केली. त्याचप्रमाणे अधिवेशन काळात उपमुख्यमंत्री अजित पवार व शासन जनतेची भलावण करीत आहेत. हे सर्व न करण्यासाठी शासनाने त्वरित त्या काळातील वीजबिले माफ करावीत. अन्यथा महाराष्ट्र बंदची हाक द्यावी लागणार आहे. सद्यस्थितीत ग्रामीण भागात वीज तोडणी बंद करण्याचे आदेश असतानाही काही गावांमध्ये वीज तोडली जात आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागासह तरुण मंडळांमध्ये जनजागृती सुरू केली आहे. त्याचा एक भाग म्हणून ही बैठक आयोजित केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बाबा पार्टे म्हणाले, अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तात्पुरत्या स्वरूपात ही घोषणा केली असल्यास आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे महावितरणने कृषी व घरांची वीज तोडू नये, अशी मागणी केली. यावेळी बाबा इंदुलकर, जयकुमार शिंदे, जोतिराम घोडके, सचिन घाटगे, ॲड. दत्ताजी कवाळे, बाबासाहेब पोवार, दुग्रेस लिंग्रज, अशोक भंडारे आदी मान्यवर उपस्थित होते.