कोल्हापूर : बालहक्कांचा विषय माध्यम आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी योग्य पद्धतीने मांडल्यास हजारो हात मदतीसाठी पुढे येतील. बालहक्कांबाबतच्या जागृतीसाठी प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी कृतीशील योगदान देणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी गुुरुवारी येथे केले.
विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभाग आणि युनिसेफतर्फे ग्रामीण पत्रकारांसाठी आयोजित बालहक्कविषयक जागृतीपर कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठाच्या मानव्यविद्या सभागृहात ही कार्यशाळा झाली.
डॉ. नांदवडेकर म्हणाले, आज आपल्या देशातील साधारण निम्म्या बालकांना पुरेसा आहार मिळत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे या बालकांचे योग्य संगोपन होऊन त्यांना देशाच्या विकासातील भागीदार बनवायचे असेल, तर बाल आरोग्याचा प्रश्न प्राधान्याने हाताळायला हवा. आरोग्य चांगले राहण्यासाठी उत्तम आहार आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उत्तम शिक्षण सुविधांची उपलब्धता करून देणे हे प्राधान्यक्रमाचे मुद्दे असावेत.
अन्न, शिक्षणासह बालमजुरीला प्रतिबंध करण्यासाठी पत्रकारांसह प्रत्येक समाजघटकाने कृतीशील पुढाकार घ्यायला हवा. असे बालमजूर आढळल्यास त्यांच्याशी संवाद साधून, योग्य मार्गदर्शन करून त्यांना शाळेत जायला प्रवृत्त करायला हवे. केंद्र सरकारने त्यांना प्रदान केलेल्या शिक्षणाच्या अधिकारांतर्गत मोफत शिक्षण आणि माध्यान्ह पोषण आहार याविषयीची माहिती देऊन शिक्षणाच्या प्रवाहात त्यांना सामील होण्यास प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
या कार्यक्रमास युनिसेफ (महाराष्ट्र)चे संवाद सल्लागार तानाजी पाटील, सहयोगी प्राध्यापक डॉ. शिवाजी जाधव, डॉ. सुमेधा साळुंखे यांच्या पत्रकार, विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होत्या. वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. निशा मुडे-पवार यांनी प्रास्ताविक केले. चंद्रशेखर वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, उदघाटनाच्या सत्रानंतर कार्यशाळेत सी.डब्ल्यूसी (कोल्हापूर)चे अतुल देसाई, युनिसेफचे तानाजी पाटील आणि कोल्हापूरच्या शहाजी विधी महाविद्यालयाचे डॉ. प्रवीण पाटील यांनी बालहक्कांच्या विविध पैलंूबाबत मार्गदर्शन केले.
आपापल्या परी योगदान द्या
मुलांच्या मूलभूत अन्न, वस्त्राच्या गरजा भागवून त्यांना शिक्षण आणि आरोग्य सुविधांची उपलब्धता करणे हे प्रत्येक शासनाचे आद्य कर्तव्य असल्याचे डॉ. नांदवडेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, सन २०१०च्या एका आकडेवारीनुसार, आपल्या देशात एका मुलामागे आपण दैनंदिन ४.४४ रुपये खर्च करतो, तर विकसित देशांत हा आकडा त्याहून चौपट आहे. विकसित आणि विकसनशील देशांमधील ही मोठी दरी सांधण्यासाठी सर्व घटकांनी आपापल्या परीने योगदान देण्याची गरज आहे.