आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. ८ : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जनता सेंट्रल को-आॅप. कंझ्युमर्स स्टोअर्स (जनता बझार)च्या निवडणुकीत सत्तारूढ गटाला उमेदवारी अर्ज पात्रतेसाठी कसरत करावी लागणार आहे. संचालक मंडळ बरखास्त केल्याने तत्कालीन संचालकांचे तर किमान पाच हजार रुपयांची खरेदी नसल्याने नवीन इच्छुकांचे उमेदवारी अर्ज पात्र ठरणार नाहीत. यामुळे दिग्गजांना रिंगणाबाहेरच राहावे लागण्याची शक्यता आहे.
जनता बझारच्या १९ जागांसाठी विविध गटांतून ८२ अर्ज दाखल झाले आहेत. संस्थेचे माजी अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, प्रकाश बोंद्रे, उदय पोवार, आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत; पण गेली दोन-तीन वर्षे संचालक मंडळाच्या कारभाराविरोधात सर्वाधिक तक्रारी या माजी कर्मचाऱ्यांनीच केल्या होत्या. त्यातूनच संचालक मंडळ बरखास्त झाले होते.
विद्यमान संचालक मंडळाविरोधात माजी कर्मचाऱ्यांनी मोट बांधली असून, त्याना काही माजी संचालकांचेही पाठबळ आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून या गटाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सत्तारूढ गटानेही जोरदार तयारी केली असून, माजी संचालकांचे अर्ज अडचणीत येणार असले तरी त्यांनीही वारसदारांना रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे.
संस्थांच बंद तर खरेदी कोठून करायची?
निवडणूक लढविण्याच्या पात्रतेसाठी संस्थेच्या दुकानातून किमान पाच हजारांची खरेदी करणे बंधनकारक आहे; पण संस्थेची दुकाने गेली पाच-सहा वर्षांपासून बंद असल्याने खरेदी कोठून करायची? असा पेच इच्छुकांसमोर आहे.
राजकीय हस्तक्षेप!
संस्थेवर सध्या प्रशासक असून एकही विभाग कार्यरत नसल्याने इमारतींचे भाडे हाच काय उत्पन्नाचे स्त्रोत आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होऊन बझार पुन्हा गती घेईल, असे वाटते. पण, निवडणुकीतील राजकीय हस्तक्षेप पाहता बिनविरोधची शक्यता धूसर आहे. गटनिहाय मतदान, कंसात निवडून द्यायच्या जागा- ‘अ’ वर्ग - २३०० (८) ‘ब,‘ड’,‘ई’-१४ (५) ‘क’-१६ (१) राखीव गटातील-५