कोल्हापूर : गांधीजींचा नई तालीम हा शैक्षणिक विचार आजही कसा उपयुक्त आहे, हे स्पर्धेच्या युगात समजावे, त्याचा प्रसार व्हावा, मुलांचे भावविश्व टिकविण्याचे प्रयत्न व्हावेत, या हेतूने चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत येथील शाहू स्मारक भवनात १० मार्चपासून १३ मार्चपर्यंत सेवाग्रामच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे आणि लिखाणाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.रविवार, दि. १० मार्च रोजी दुपारी चार वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ समााजिक कार्यकर्ते आणि बेळगावच्या आरीपीडी कॉलेजचे निवृत्त प्राचार्य आनंद मेणसे यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनाचे संकल्पक ज्येष्ठ रंगकर्मी संजय हळदीकर, चिल्लर पार्टीचे या उपक्रमाचे समन्वयक मिलिंद कोपार्डेकर यावेळी उपस्थित राहणार आहेत. हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत पाहण्यासाठी खुले राहणार आहे.अशी आहे ‘नई तालीम’महात्मा गांधी यांनी ‘नई तालीम’ हा शिक्षणविषयक विचार १९३७ मध्ये सर्वप्रथम मांडला. इंग्रजांच्या मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीच्या आहारी गेलेल्या भारतीय शिक्षणपद्धतीला पर्याय म्हणून गांधीजींनी हा विचार दिला. काही काळ या विचारावर शाळाही सुरू झाल्या; पण कालौघात त्या लयाला गेल्या. २००५ मध्ये वर्धा येथील ‘सेवाग्राम’मध्ये आनंदनिकेतन या शाळेत नई तालीम या विचारांपासून प्रेरित शिक्षण देण्यासाठी शाळा सुरू करण्यात आली.संकल्पक संजय हळदीकर यांचे प्रयत्नया प्रदर्शनाचे संकल्पक कोल्हापूरचे रंगकर्मी संजय हळदीकर यांनी सेवाग्रामच्या या शाळेतील विद्यार्थ्यांना नाटक शिकविताना नई तालीम शिक्षणपद्धतीबद्धल काय वाटते हे तेथील विद्यार्थ्यांच्या चित्रातून जाणून घेतले. या विद्यार्थ्यांनी त्यांच्या चित्रातून ‘नई तालीम’विषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. हळदीकर यांनी या विद्यार्थ्यांकडून या संदर्भात लिखाणही लिहून घेतले आहे, जे या प्रदर्शनात समाविष्ट केले आहे.चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळदर महिन्याच्या चौथ्या रविवारी मुलांसाठी विनामूल्य चित्रपट दाखविण्याबरोबरच मुलांच्या भावविश्वातील इतरही माध्यमांचा उपयोग करून एकविचाराने सकस असा समाज घडविण्याचा प्रयत्न चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ करीत आहे.