कोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीसमोर सोमवारी (दि. १६) निदर्शने करण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठ सेवक संघाने गुरुवारी द्वारसभेत घेतला.आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी गुरुवारी दुपारी दोन ते अडीच या वेळेत संघाने द्वारसभा घेतली. त्यामध्ये संघाचे अध्यक्ष बाबा सावंत यांनी प्रलंबित मागण्यांबाबतची माहिती दिली.
या मागण्यांबाबत दि. ६ जूनला कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत चर्चा करून व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विषय ठेवण्याचे निश्चित झाले. काही प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शिक्षण सहसंचालकांसमवेत बैठक आयोजित करण्याचे ठरले.
ई-सेवार्थबाबत मंत्रालयामध्ये चर्चा होणार होती. मात्र, आजअखेर प्रशासनाकडून काहीच कार्यवाही झाली नसल्याचे अध्यक्ष सावंत यांनी सांगितले. त्यानंतर व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीसमोर सोमवारी बैठी निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी सेवक संघाचे उपाध्यक्ष अरुण वणिरे, चिटणीस विष्णू खाडे, विशांत भोसले, मिलिंद भोसले, सुरेश पाटील, अतुल एतावडेकर, अजय आयरेकर, विनय पाटील, शिवाजी शेळके, सुनीता यादव, देवयानी यादव, शरद तळेकर, आदी उपस्थित होते.