कोल्हापूर : मटका, जुगारातील वीस अवैध धंदेवाईकांना शाहूपुरी पोलिसांनी जिल्ह्यातून वर्षभरासाठी हद्दपार केले. ऐन गणेशोत्सवात ही कारवाई झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. येत्या दोन दिवसांत जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही अवैध धंदेवाईक गुन्हेगारांवर कारवाई होणार आहे.
शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका, जुगारासह अन्य अवैध धंद्यांत गुंतलेल्या गुन्हेगारांची यादी शाहूपुरी पोलिसांनी तयार करून त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्याकडे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सादर केला. तो प्रस्ताव करवीर प्रांताधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला. या प्रस्तावाला शनिवारी मान्यता मिळाली. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे ‘कलम ५५’प्रमाणे हद्दपारीची कारवाई झाली. या अवैध धंदेवाईकांना नोटिसा पाठवून हद्दपार होण्याचे आदेश पोलिसांनी दिले.
यांच्यावर झाली कारवाई
आयूब खुद्दबुद्दीन जमादार (वय ४९, रा. बागल चौक) याच्या टोळीतील संजय रामचंद्र देसाई (४५ रा. जवाहरनगर), दत्ता शंकर माळी (५५, शिरोळ, ता. हातकणंगले), कयूम इमाम शेख (६७ रा. विक्रमनगर), नितीन चंद्रकांत कांबळे (३९, विचारे माळ), श्रीकांत शंकर पाटील (३३ रा. हणबर गल्ली, कागल), शशिकांत श्रीधर शिंदे (४६ रा. एकसंबा, ता. चिकोडी, जि.बेळगांव), फिरोज हमीद सय्यद (३६ रा. संभाजीनगर, कळंबा),रणजित बाळासाहेब कारंडे (३२ रा. लोणार वसाहत), प्रकाश बाजीराव निकम (४२, कसबा बावडा, भगतसिंग वसाहत), युनूस लियाकत पठाण (वय ४५ रा. विचारेमाळ), दिनकर सदाशिव पाटील (६० रा. कदमवाडी), मनोज हिरालाल मनसुखानी (४०, वळिवडे, करवीर), मनोहर अर्जुना कांबळे (५२, रा. प्रयाग चिखली), गंगाराम ऊर्फ राजाराम कोयाप्पा येडगे (३४, कनाननगर), गणेश विष्णू शिंगे (२६, विचारेमाळ), बजरंग बापूसो घुणकीकर (४८, कनाननगर), कानिफनाथ गणपतराव पाटील (३०, रा. सदर बझार), जयदीप नामदेव उलपे (२७, रा. उलपे मळा), मयूर मारुती थडगे (२५, कनाननगर) यांचा समावेश आहे.