* व्यथा आंबेओहळ धरणग्रस्तांची : बंधाऱ्याचे उद्घाटन झाले...कामाचा पत्त्या नाही..!
रवींद्र येसादे
उत्तूर : १९९८ मध्ये मंजूर झालेला आजरा तालुक्यातील बहुचर्चित आंबेओहळ प्रकल्प तब्बल २१ वर्षांपासून रखडला आहे. प्रकल्पाचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा वनवास संपता संपेनासा झाला आहे. ११ डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत ठोस निर्णय होणार का, असा प्रश्न विस्थापितांना पडला आहे. बंधाऱ्याचे उद्घाटन झालेल्या कामाचा पत्ता नाही. ३० कोटींचा प्रकल्प २३० कोटींवर गेला आहे. या प्रकल्पात १.२४ द.ल.घ.फू. इतका पाणीसाठा होणार आहे. या प्रकल्पामुळे आजरा तालुक्यातील २१२२ हेक्टर व गडहिंग्लज तालुक्यातील ४२२० हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. त्यासाठी कोल्हापूर पद्धतीच्या सात बंधाऱ्यांच्या कामाचा उद्घाटनानंतरही परवड कायम आहे. २१ वर्षांत धरणाचे पूर्ण झालेले काम सरकारी कागदावर ८५ टक्के असल्याचे सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात हे काम कमीच असल्याचे वास्तव आहे. धरणग्रस्तांच्या दाखल्यात अनेक त्रुटी आहेत. नोकरीत धरणग्रस्तांना प्राधान्य देणे गरजेचे असताना अनेक युवक नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबत प्रकल्पातील धरणग्रस्तांना नोकरीचा लाभ मिळाला नाही. जमीन दाखविण्यासाठी क्रमपाळीनुसार जमीन देणे बंधनकारक असताना ‘हाजीर तो वजीर’ अशी अवस्था आहे. फक्त जमिनीची यादी दिली जाते.
जमीन शोधणे शेतकऱ्यांना अडचणींचे ठरत आहे. जमिनी पाहायला गेल्यानंतर वादाचे प्रकारही घडत आहेत. धरणात जमिनी गेल्या, पर्यायी जमिनी नाही, भरपाईदेखील नाही, त्यामुळे धरणग्रस्तांवर उपासमारीची वेळ आली आहे. पुनर्वसनासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. परिपूर्ण माहिती कोणत्याही कार्यालयातून मिळत नाही.
-------------------
* सर्वसामान्यांना वाली कोण
अनेक प्रकल्पग्रस्त अनपढ आहेत. गेल्या २१ वर्षांत केवळ शासनाच्या भरवशावर अवलंबून आहेत. कांही विस्थापितांचे सत्ताधारी मंडळींशी लागेबांधे आहेत. त्यांची कामे निमूटपणे करतात. एजंटगिरीमुळे काही कामे झाली. पुनर्वसनासाठी प्रकल्पाच्या कामास विरोध करणाऱ्यांना बाजूला सारले जातात अशा सर्वसामान्यांना वाली कोण? अशी विचारणाही होत आहे.
-------------------------
*
उद्घाटन, पॅकेज
हसन मुश्रीफ आमदार असताना कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे उद्घाटन झाले. ३६ लाखांच्या पॅकेजला सुरुवात झाली. मात्र, त्यातही अडचणींचा डोंगर उभा आहे. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे काम कोठेही सुरू नाही. पालकमंत्री असताना चंद्रकांत पाटील यांनी प्रकल्प पूर्ततेची घोषणा केली होती त्यांचेही प्रयत्नही अपुरे ठरले.
---------------------
* बैठका नको कार्यवाही हवी ११ डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीस धरणग्रस्तांचे लक्ष लागून राहले आहे. २१ वर्षांत अनेक बैठका झाल्या. मात्र, प्रश्न तसाच राहिला. बैठका करून वेळ मारून काम करण्यापेक्षा काम पूर्तता झाली झाली पाहिजे, अन्यथा पुनर्वसनासाठी आंदोलन छेडावे लागेल.
- शिवाजी गुरव, धरणग्रस्त.
-----------------
* लिपिकाची बदली केव्हा
गडहिंग्लजच्या प्रांत कार्यालयातील गेली कित्येक वर्षे लिपिकांकडे धरणग्रस्तांच्या कागदपत्रांचे काम पाहतो. हा लिपिक धरणग्रस्थांना नाहक त्रास देतो. एकाच ठिकाणी ठाण मांडून असणारा लिपिक धरणग्रस्तांना वेठीस धरतो. मागणी करूनही बदली नाही याचे गौडबंगाल काय ?
- महादेव खाडे, धरणग्रस्त.
-------------------------
फोटो ओळी : आंबेओहोळ प्रकल्पातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे वर्षापूर्वी उद्घाटन झाले; मात्र अद्याप कामाचा पत्ता नाही.
क्रमांक : ०७१२२०२०-गड-०३