कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ले धनगरवाड्यावरील नागरिकांचा आता वनवास संपण्याच्या मार्गावर आहे. या धनगरवाड्याला जोडण्यासाठी लागणाऱ्या साकव बांधणीसाठी खासदार संजय मंडलिक यांनी ३५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे म्हासुर्लेपैकी मधला धनगरवाडा, पादुकाचा धनगरवाडा, राणग्याचा धनगरवाडा येथील नागरिकांना दवाखाना, बँका, बाजार यासाठी जवळचा बारमाही मार्ग उपलब्ध होणार आहे.
पक्क्या रस्त्यांअभावी उपचार वेळेत न झाल्याने एक गर्भवती आणि सर्पदंशाने शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याने हा धनगरवाडा विशेष चर्चेत आला होता. यासाठी बरीच आंदोलने, मंत्रालयापर्यंत पाठपुरावा झाला. खासदार संजय मंडलिक यांनी यात विशेष लक्ष घालून यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून जिल्हा नियोजन समितीमार्फत ३५ लाखांचा निधी खेचून आणला आहे. या निधीतून म्हासुर्ले ते सावंतवाडी ते मधला धनगडवाडा येथील ओढ्यावर साकव बांधला जाणार आहे. यामुळे रस्त्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे.
खासदार मंडलीक यांनी नुकत्याच झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये व जिल्हा वार्षिक योजनेमधून चंदगड, आजरा व राधानगरी तालुक्यासाठी सुमारे सात कोटी रुपयाचा निधी मंजूर करुन आणला आहे. यातून या डोंगरी व दुर्गम तालुक्यांतील बहुतांशी रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
चौकट ०१
राधानगरी धरण सुशोभिकरणासाठी ५० लाख
स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेले राधानगरी धरण पर्यटकासाठी पर्वणीच आहे. लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी केलेले धरण निर्मितीचे ऐतिहासिक कार्य पर्यटकांना कळावे म्हणून धरण परिसराचे सुशोभिकरण होणार आहे. येथेच सुंदर बागही विकसित होणार आहे. धरण स्थळावर दगडी फरशी बसविण्यासाठी विद्युतीकरण केले जाणार आहे, धरण स्थळावर दगडी फरशी बसवून विद्युतीकरण करणे याकरिता ५० लाखांचा निधी मंजूर करून आणला आहे.
चौकट ०२
होणारे रस्ते
चंदगड : राज्य मार्ग ते कानूर - कुरणी - गवसे - इब्राहिमपूर - अडकूर सुधारणा करणे व गटर्स यासाठी १ कोटी १० लाख
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ते कवळीकट्टी, दड्डी ते राजगोळी कुदनूर - कालकुंद्री - कागणी, किणी - नागरदळे - कडलगे - ढोलगरवाडी - मांडेदुर्ग - कार्वे सुधारणा करणेकरीता ३ कोटी रुपये
भडगांव - चन्नेकुप्पी - नूल बसर्गे सुधारणा करणेकरीता १ कोटी १० लाख तर आजरा तालुक्यातील भादवण, पेद्रेवाडी - कोवाडे - मलिग्रे - कागिनवाडी - कोळिंद्रे रुंदीकरणासह सुधारणा करणे करीता ७५ लाख