संजय पारकर ।राधानगरी : २०१८ च्या पावसाळ्यात मोठा गाजावाजा करून राज्य शासनाच्या विविध विभागांकडून राधानगरी तालुक्यात एक लाख ६७ हजार ९०० झाडे लावण्यात आली. यात वनीकरण विभागाने ३३ हजार १६५, प्रादेशिक वन विभागाने ६७ हजार ११० व ग्रामपंचायती, शाळा, अन्य विभागांनी ६७ हजार ६२५ झाडांचे रोपण केले होते. यापैकी वनीकरण व वन विभाग नंतर काही प्रमाणात देखभाल करतात. त्यामुळे यातील किमान ६० ते ७० टक्के झाडे जगतात.
मात्र, अन्य विभागांकडून होत असलेल्या वृक्षारोपणाची देखभाल होत नाही. परिणामी, यातील बहुतांश झाडे पावसाळ्यानंतर अस्तित्वात नाहीत. ही मोहीम केवळ शासनाकडून सक्तीची आहे म्हणून ती पूर्ण करण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र, त्यासाठी खर्च होणारा वेळ व पैसा वायाच जात आहे. सामाजिक वनीकरण विभाग अनेक वर्षे गायरान, ग्रामपंचायतींच्या पडीक जागेत वनीकरण करते. तीन वर्षे त्याची जोपासना करून नंतर ती हस्तांतर केली जाते. हस्तांतर करताना किमान ७० टक्के रोपे जिवंत असणे आवश्यक असल्याने त्यांची जोपासना केली जाते. लागवडीनंतर काही कारणांमुळे मर होणाऱ्या रोपांच्या ठिकाणी पुढील पावसाळ्यात रोपे लावली जातात. प्रादेशिक वन विभागाकडील जमिनीवर या विभागाकडून दरवर्षी रोपलागवड केली जाते. याची देखभाल करण्यासाठी मनुष्यबळ व आर्थिक तरतूद असल्याने रोपांची जोपासना चांगल्या प्रकारे होते. गतवर्षी या विभागाने केळोशी बुद्रुक येथे दोन ठिकाणी प्रत्येकी २० हेक्टरवर ३६ हजार, केळोशी खुर्द येथे ११ हजार ११० जंगली जातीच्या रोपांची लागवड केली आहे व कंदलगाव येथे ५० हेक्टरवर २० हजार बांबूची लागवड केली आहे. गेल्या मे महिन्यात त्यांची पाहणी केल्यावर त्यातील ९६ टक्के रोपे जिवंत असल्याचे आढळले आहे.
अन्य शासकीय-निमशासकीय विभाग आपले आवार, रस्त्याच्या बाजूने रोपे लावतात; परंतु शाळांच्या आवारात मुलांनी केलेली देखभाल वगळता कोठेही त्यांची देखभाल होत नाही. ग्रामपंचायती दरवर्षी असे कार्यक्रम घेतात. यावर मोठा खर्च होतो; पण त्या झाडांचे पुढे काय झाले, याची पाहणीही होत नाही. त्यामुळे जगणाºया झाडांचे प्रमाण अगदीच अल्प आहे.यासाठी काढलेल्या खड्ड्यांतच पुन्हा पुढील वर्षी वृक्षारोपण करून सोपस्कार पूर्ण केले जातात. एका झाडासाठी खड्डा काढणे, रोप लावणे यासाठी किमान १५ ते २५ रुपये खर्च होतात. त्यामुळे यावर होणारा मोठा खर्च वाया जातो.चार लाख ८0 हजार वृक्षारोपणाचे उद्दिष्टवन विभागाने यावर्षी ३७ ठिकाणी ६५० हेक्टरवर चार लाख ८० हजार रोपे लावण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. यासाठी कोनोली व आपटाळ येथ ४.९५ लाख रोपे तयार केली आहेत. वनीकरण विभागाने पडळी, फराळे, ऐनी व पिरळ येथील नर्सरीत सहा लाख रोपे तयार केली आहेत. त्यातील स्वत: २.२५ लाख लावणार आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीलातीन३ हजार याप्रमाणे तीन लाख रोपे देण्यात येणार आहेत व उर्वरित एक लाख रोपे अन्य विभाग, शाळा, महाविद्यालय व खासगी व्यक्ती यांना दिली जाणार आहेत.
कोल्हापूरची थेट पाईपलाईन योजना मार्ग, गैबी-मुदाळ तिट्टा, शेळेवाडी ते मुदाळ तिट्टा, तसेच म्हासुर्ली परिसरात रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे हे मार्ग भकास झाले आहेत. या ठिकाणी सक्तीने झाडे लावणे व त्यांची जोपासना करणे आवश्यक आहे.अनुकूल हवामान, भरपूर पाऊस, आदी कारणांमुळे झाडे जगणे व त्यांची वाढ होण्याचे प्रमाण येथे चांगले आहे. मात्र, त्यांची लागवडीनंतर काही दिवस तरी किमान देखभाल होणे गरजेचे आहे.