गगनबावडा : कोल्हापूर जिल्हा हा सह्याद्रीच्या रांगांनी दूरवर पसरलेला आहे. या डोंगरातील काही पठारी प्रदेशावर निमसदाहरित वनस्पती मोठ्या प्रमाणात दिसतात. गेल्या काही वर्षांपासून साळवण, मणदूर, मांडुकली, शेणवडे, अणदूर, असळज, सैतवडे, सांगशी, बोरबेट या भागातील डोंगरमाथ्यावर सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून डोंगर हिरवे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विदेशी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने निलगिरी, ऑस्टेलियन बाभळ, गिरीपुष्प, गुलमोहर यांची लागवड अगदी मोठ्या प्रमाणात झाली आहे. या भागातील डोंगर पठारावर विदेशी झाडांची वाढ मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे स्थानिक वनस्पती व जैवविविधता मोठ्या प्रमाणात धोक्यात आली आहे. या विदेशी वनस्पतींना घाणारे पशुपक्षी व सुक्ष्म जीव आपल्याकडे नाहीत. या वनस्पती परदेशातील आहेत. या वनस्पतींवर पक्षी घरटे बांधत नाहीत. त्यांचा पाला फळे खात नाहीत. या वृक्षाची, वनस्पतीची पानझड झाल्यावर या वनस्पतींच्या खाली साधे गवतही उगवत नाही. झाडाचा पाला जामिनीवर साचून राहतो तो कुजतदेखील नाही. सध्या तर रानमोडी या परकीय झुडपाने विळखा घालण्यास सुरुवात केली आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्याचे उच्चाटन करण्याची गरज आहे. परिणामी, डोंगर पठरावर असणारे प्राणी मोठ्या प्रमाणात डोंगरातून शिवाराकडे स्थलांतर करतात. गिरीपुष्प सारख्या वनस्पतीमुळे स्थानिक असणाऱ्या वनस्पती त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाहीत. विदेशी वनस्पती शेजारी असणारी स्थानिक झाडे मृत पडत आहेत. या वनस्पतीच्या फुलांच्या वासामुळे अनेक सरपटणारे प्राणी वस्तीत, शिवारात घुसत आहेत. या वनस्पतींच्या फुलांचा वास इतका उग्र असतो की पशुपक्षी फिरकत नाहीत. भविष्यात वृक्ष लागवड करताना वन विभागाने सामाजिक वनविभागाने अभ्यास करून येथील जैवविविधतेला पूरक असणाऱ्या वड, पिंपळ,कडूलिंब, चिंच, आंबा, उंबर, बाभूळ या फळे, फुले येणाऱ्या वनस्पतींची लागवड करावी जेणेकरून येथे सजीव सृष्टी समृद्ध होणार आहे.
[ अनेक डोंगर पठारावर विदेशी झाडांची लागवड केल्यामुळे जैवविविधतेत मोठा धोका निर्माण झाला आहे. या विदेशी वनस्पतींवर पशु-पक्षी बसत नाहीत, घरटे बांधत नाहीत. आपल्या भागातील जैवविविधता देशी झाडांची लागवड करणे गरजेचे आहे. शोभेसाठी जंगले वाढविणे गरजेचे नाही, तर त्याचा वापर जैवविविधता टिकविण्यासाठी झाला पाहिजे. ] निसर्गप्रेमी = अमर मारुतीराव जत्राटे. (बालिंगे )
फोटो वृत्त = शेणवडे (ता. गगनबावडा) येथील डोंगरावर उंचच्या उंच वाढलेली विदेशी वनस्पती.