सरदार चौगुलेपोर्ले तर्फ ठाणे : दक्षिण अमेरिकेच्या जलाशयात अधिवास असणारा सकर मासा येथील कासारी नदीपात्रात मासेमारी करणाऱ्यांच्या जाळ्यात सापडला. भारतीय वंशाच्या माशांवर हल्ला करून उपजीविका भागविणारा हा मासा खाण्यासाठी अयोग्य आहे. यापूर्वी उजनी धरण आणि कृष्णा नदीपात्रात या माशाचे अस्तित्व आढळले होते. येथील सुनील जाधव, अनिल जाधव आणि कृष्णात सातपुते मासेमारीचा व्यवसाय करतात. त्यांना कासारी नदीत मासेमारी करताना जाळ्यात वेगळ्या प्रकारचा सकर मासा सापडला. त्यांच्याबाबत काहीच माहीत नसल्याने त्यांनी त्याला पाण्याच्या टाकीत सुरक्षित ठेवले आहे.हा मासा दक्षिण अमेरिकेतील आहे. फिश टँकमधील शोभीवंत म्हणून या माशाला पाळले जाते. कालांतराने त्याच्या आकारामुळे त्याला सांभाळणे शक्य नसल्याने लोक त्याला जवळपासच्या नैसर्गिक अधिवासातील तलाव, नदीत सोडतात. परंतु, हेच कृत्य तेथील अधिवासाला घातक ठरत आहे. कारण हा मासा त्या अधिवासामध्ये सापडणाऱ्या प्रदेशनिष्ठ माशांची अंडी व त्यांच्या लहान पिलांना भक्ष्य बनवतो आणि आपली संख्या वाढवतो. भारतातील अनेक जलाशयांमध्ये परदेशी माशांनी अस्तित्व निर्माण केले आहे. यांच्यामुळे तेथील जलसंपदा नष्ट होत आहे. कठोर कवचांनी बनलेल्या शरीरयष्टीमुळे हा मासा खात नाहीत. अशा प्रकारच्या माशांच्या जाती छंदापोटी पाळतात आणि आकारामुळे पाळणे शक्य नसल्याने नद्या, तलावांमध्ये सोडल्याने मत्स्य प्रजातींसाठी बाधक ठरत आहेत.याच प्रकारचा जेवणामध्ये वापरला जाणारा तिलाप मासा सकर माशाप्रमाणे बाहेरच्या आफ्रिकेतून माणसांच्या हौसेसाठी आणला गेला. चांगल्या चवीमुळे लोकांनी त्याला स्वीकारले. तिलाप मासा नदी, तलावामधील देशी माशांना भक्ष्य बनवून जगत असून, त्यांची प्रजात वाढताना दिसत आहे. विदेशी माशांना पसंती देणे टाळावे. त्याचबरोबर त्यांना अशा नैसर्गिक अधिवासामध्ये सोडू नये जेणेकरून आपली जैवविविधता अबाधित राहील.
भारतीय वंशाच्या माशांना घातक ठरणाऱ्या परदेशी माशांच्या जातींची माहिती नागरिकांना दिली पाहिजे. परदेशी मासे नैसर्गिक जलाशयात सोडल्यास त्याचे परिणाम किती घातक होऊ शकतात, याविषयी प्रशासनाने जागरूक केले पाहिजे. तिलाप जातीच्या माशाची शेती संवेदनशील क्षेत्रात असणाऱ्या पाण्याच्या साठ्यांमध्ये करण्यास प्रशासनाने बंदी आणावी. त्यामुळे प्रदेशनिष्ठ माशांच्या जातींचे अस्तित्व संपवणार नाही. - अभिषेक शिर्के, प्राणीशास्त्र विद्यार्थी ( मत्स्य निरीक्षक)