आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि.१0 : पक्षाचा विस्तार करण्यासाठी तुम्ही भागात पंधरा दिवसांसाठी जात आहात.एकवेळ पक्षाचा फायदा नाही झाला तरी चालेल परंतू हा माणूस आमच्याकडं पाठवला नसता तर बरं झालं असतं अशी कुणाचीही प्रतिक्रिया येता कामा नये. तुमच्या व्यवहारातून, वर्तनातून पक्ष विचार समाजाला समजला पाहिजे इतक्या स्पष्ट शब्दात भाजपचे नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील ‘भाजप विस्तारकांना’ कानमंत्र दिला.
पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी कार्यविस्तार मोहिमेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील विस्तारकांचा वर्ग येथील एका हॉटेलवर बुधवारी दिवसभर घेण्यात आला. दिवसभर चाललेल्या या वर्गामध्ये दुपारी हजेरी लावत चंद्रकांतदादांनी अतिशय मोजक्या शब्दात कार्यकर्त्यांना विस्तारक म्हणून काम कसे करावे याची दिशा दिली.
पाटील म्हणाले,अतिशय साधेपणाने वागणूक ठेवा. सुसंस्कृत पक्ष आहे हे व्यवहारातून दिसले पाहिजे. गावात मुक्कामाला गेल्यानंतर हॉटेलवर, रेस्ट हाऊसवर राहू नका. घरात गेल्यावर खुर्चीच पाहिजे आणि जेवणात ताकच पाहिजे असा आग्रह धरू नका. तुमच्या तिथल्या वास्तव्याने त्या घराला, गावाला, विभागाला पुढे नेण्याचे काही तरी नियोजन झाले पाहिजे. कुणाच्या तरी आयुष्यात बदल झाला पाहिजे. पक्षाच्या योजना सांगा,तिथल्या युवकांशी बोला. चांगल्या कामांसाठी आपल्याकडे निधीची कमतरता नाही. कामं करणारी चांगली माणसं समाज शोधत असतो. त्यामुळे तो विधायक कामांसाठी खिशात हात घालायला मागे पुढे बघत नाही.
भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री रवि अनासपुरे म्हणाले,भाजपमध्ये गट तट नाही. मी या गटाचा, मी या नेत्याचा असे प्रकार नाहीत. त्यामुळे भाजप हाच गट मानून कार्यकर्र्त्यांनी कार्यरत राहण्याची गरज आहे. आपला दिनक्रम ठरवा, वेळेचे नियोजन करा, अगदी मंत्र्यांचे जसे नियोजनपूर्वक दौरे असतात तसेच आपले दौरे तयार करून त्याची अंमलबजावणी करा.
यावेळी व्यासपीठावर भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके, महानगर अध्यक्ष संदीप देसाई, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सदस्य सुभाष वोरा हे व्यासपीठावर उपस्थित होते. संघटनमंत्री बाबा देसाई, विजय जाधव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे,प्रदेशचे सदस्य सुहास लटोरे, महापालिकेतील भाजपचे गटनेते विजय सुर्यवंशी, ताराराणीचे गटनेते सत्यजित कदम, जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते अरूण इंगवले, महानगरपालिकेचे नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, बाराही तालुक्यांचे पदाधिकारी व विस्तारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आधी लगीन कोंढाण्याचे
भाजपच्या अनेक सत्रांमध्ये, कार्यक्रमांमध्ये चंद्रकांतदादा येण्याआधी वातावरण तयार करण्याची महत्वाची भूमिका आमदार सुरेश हाळवणकर बजावत असतात. या ही शिबीरामध्ये त्यांनी भाषणात अनेकांना चिमटे काढत वातावरण हलके फुलके करताना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना सांगितल्या. माझ्या मुलांचे १९ मे रोजी इचलकरंजीला लग्न आहे. त्या तयारीत मी आहे. मात्र बाबा देसाई यांचा फोन आला की शिबीरात मार्गदर्शन करायला या.. तेव्हा आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे या न्यायाने मी या ठिकाणी आलो असे सांगत हाळवणकर यांनी टाळ्या घेतल्या.