संदीप बावचे ।
शिरोळ : शिरोळ नगरपालिका निवडणुकीसाठी चौरंगी लढत होत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी निवडणूक जाहीरनामा काय असावा, हा प्रश्न समोर आला आहे. विकासकामांबरोबरच शहरातील स्वच्छता, मोकाट जनावरे, अतिक्रमण, प्रॉपर्टी कार्डाचा प्रश्न, स्वतंत्र भाजीमंडई, पार्किंगचे नियोजन, सांडपाण्याचा प्रश्न, उपनगरातील अंतर्गत रस्ते, अपुरे नाट्यगृह, सक्षम पाणीपुरवठा योजना, आदी मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्यासाठी आघाडी व पक्षांनी प्रयत्न करावेत, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
पालिका निवडणुकीच्या निमित्ताने पक्ष व आघाड्यांकडून मतदारांवर विकासकामांच्या आश्वासनांचा पाऊस पाडला जातो. जाहीरनाम्यातून अनेक आश्वासने दिली जातात. शहरात अनेक समस्या असतात. त्यातील निम्म्याहून अधिक सुटल्यास नागरिकांना समाधान असते. मूलभूत समस्येमधील रस्ते, गटारी हे प्रश्न सोडविणे ही प्रामुख्याने नगरपालिकेकडून होत असले तरी शहरासाठी सक्षम पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे गरजेची बाब बनली आहे. सध्या एक दिवसाआड पाणीपुरवठा शहराला होतो. वाढीव उपनगरांमुळे शहराचा विस्तार वाढला आहे. त्यामुळे शुध्द व मुबलक पाणी ही काळाची गरज बनली आहे.
तीस टक्के भाग हा मुख्य शहराचा तर उर्वरीत सत्तर टक्के भाग हा उपनगरांचा आहे. त्यामुळे सांडपाण्याचा प्रश्न प्रामुख्याने उपनगरांना भेडसावत आहे. नव्या सभागृहासमोर सांडपाणी प्रकल्पासाठी भुयारी गटार योजना त्याचबरोबर सांडपाण्याचे नियोजन करावे लागणार आहे.
शहरात वाढती भटकी कुत्र्यांची समस्या नव्याने पुढे आली आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. शहरात नव्याने नगरपालिका झाली आहे. मोकाट जनावरांप्रश्नी निधी खर्चाची तरतूद असते. आरोग्यासाठी प्रत्येक प्रभागात स्वच्छतेची गरज निर्माण झालीआहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील दुहेरी कराचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे उपनगरातील मिळकतधारकांना प्रॉपर्टी कार्ड मिळालेले नाहीत. शहराच्या आणि शहरवासीयांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण शहरात सीसीटीव्ही बसविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. शहर विकास, नागरिकांची संभावित आर्थिक प्रगतीसर्वपक्षीय हा जाहीरनाम्यातूनशहराचा विकास व्हावा, अशी मागणी होत आहे.
झेंडे, बिल्ले, बॅनरची शहरात गर्दीशिरोळ नगरपालिका निवडणुकीसाठी प्रचाराच्या रणधुमाळीस सुरुवात झाली आहे. झेंडे, बॅनर आणि बिल्ले लावलेले समर्थक प्रभागात सक्रिय झाले आहेत. तर प्रचाराच्या ध्वनीफिती लावलेल्या रिक्षा गोंगाट करू लागल्या आहेत. भाजपने शक्तिप्रदर्शनाने प्रचाराचा नारळ फोडला, ताराराणी आघाडीने मोटारसायकल रॅलीने लक्ष वेधले, तर बहुजन विकास आघाडी व शाहू आघाडीच्या शक्तीप्रदर्शनाकडे लक्ष लागले आहे. शहराचा विस्तार मोठा असल्याने सकाळी सात वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत प्रभाग पिंजून काढत आहेत. प्रामुख्याने भाजप पक्षाच्या चिन्हावर लढत असल्याने पक्षाचे झेंडे, टोप्या शहरांत दिसत आहेत. तर आघाड्यांनीही त्याच ताकतीने प्रचार सुरु केला आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी फ्लेक्स, बॅनरची तयारी सुरु झाली आहे. सोशल मीडियावरुन जोरदार प्रचार सुरू झाला आहे.