कोल्हापूर : सध्याचे राज्यकर्ते सत्तेच्या माध्यमातून जातीचे राजकारण घट्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे या सत्तेत असलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडून सामाजिक न्यायाची अपेक्षा करणे निरर्थक आहे, असा टोला भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत लगावला.एका कार्यक्रमानिमित्त ते कोल्हापुरात आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.आंबेडकर म्हणाले, ‘अंनिस’चे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन तीन वर्षे उलटले तरी आरोपी सापडत नाहीत. त्यांच्यापाठोपाठ पानसरे, कलबुर्गी या विचारवंतांच्या हत्या झाल्या. विचारवंतांचे विचार संपविण्यासाठी हत्या होत आहेत. यावर सरकार गंभीर नसल्याचे दिसत आहे. अजूनही हत्या कोणी केली हे स्पष्ट होत नाही. सरकारने दाभोलकर-पानसरे यांच्या हत्येचा आजपर्यंत झालेल्या तपासाची कागदपत्रे प्रसिद्ध करून जनतेसमोर सत्य बाहेर आणावे.ते म्हणाले, शालेय अभ्यासक्रमात ‘आरएसएस’चा अजेंडा आणण्याचा घाट घातला जात आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मांडलेल्या नवीन अभ्यासक्रमात संघाचा चेहरा दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलुचिस्तानच्या लढ्याला पाठिंबा देऊन देशविघातक प्रवृत्तीचे समर्थन केले आहे. हे देशासाठी मारक आहे. या भूमिकेमुळे चीन व पाकिस्तानला भारतविरोधी बोलण्याची संधी दिल्याचे दिसत आहे. मुस्लिम राष्ट्रांकडे बघण्याचा दृष्टिकोन भारताला घातक आहे. (प्रतिनिधी)
आठवलेंकडून सामाजिक न्यायाची अपेक्षा निरर्थक
By admin | Published: August 21, 2016 12:16 AM