Kolhapur: सतेज पाटील यांच्याकडून अपेक्षा वाढल्या!; गडहिंग्लज विभागात नावालाच काँग्रेस, तरीही लोकसभेला भरभरून मते
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 03:58 PM2024-06-19T15:58:16+5:302024-06-19T15:58:46+5:30
हे आहेत कळीचे प्रश्न !
राम मगदूम
गडहिंग्लज : गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यात काँग्रेस पक्ष सध्या नावालाच आहे. तरीही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांना गडहिंग्लज विभागाने भरभरून मते दिली. त्यामुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्याकडून या विभागाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
शेकाप, जनता दलाचा अपवाद वगळता या विभागाचे नेतृत्व काँग्रेस / राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे दीर्घकाळ राहिले. व्ही. के. चव्हाण-पाटील, नरसिंगराव पाटील, डॉ. एस. एस. घाळी, बळीराम देसाई, बाबासाहेब कुपेकर, श्रीपतराव शिंदे यांचा दबदबा राज्यभर होता. परंतु, त्यांच्यानंतर तीनही तालुक्यात सर्वसमावेशक नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. म्हणूनच, सर्वसामान्य जनतेने मोठ्या आशेने पुन्हा काँग्रेसची कास धरली आहे.
स्वातंत्र्यानंतर साखर कारखाना, तालुकासंघ, बाजार समिती, सूतगिरणी आदींच्या माध्यमातून डोंगराळ भागाचा कायापालट करण्याचे स्वप्न काँग्रेसच्या पहिल्या पिढीतील नेत्यांनी पाहिले. परंतु, सुरुवातीचे भरभराटीचे दशक वगळता त्यांच्या हयातीतच या संस्थांना घरघर लागली, त्यांच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला गेला. म्हणूनच त्यात सकारात्मक हस्तक्षेप करण्यासाठी आमदार पाटील यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
पक्ष पुनर्बांधणीची गरज
चंदगडमध्ये गोपाळराव पाटील, कल्लाप्पा भोगण, जे. बी. पाटील यांनी नव्या उमेदीने काँग्रेसची पताका खांद्यावर घेतली आहे. आजऱ्यात जयवंतराव शिंपी, उमेश आपटे पुन्हा सक्रिय झाले आहेत. गडहिंग्लजमध्ये अप्पी पाटील यांच्या रूपाने तालुक्यात आणि स्वाती कोरी यांच्यामुळे शहरात काँग्रेसला बळ मिळाले आहे. परंतु, नव्या उमेदीने गावपातळीवर पुढे आलेल्या महिला, तरुणांना पाठबळ देऊन पक्षाची पुनर्बांधणी करण्याची गरज आहे.
निष्ठावंतांना बळ द्यावे
‘गोकुळ’ला दर्जेदार, सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या गडहिंग्लज विभागात अंजना रेडेकर या एकमेव संचालक आहेत. चंदगड-गडहिंग्लजला प्रतिनिधित्वच नाही. जिल्हा बँकेतील तीनही तालुक्यांतील संचालक हे राष्ट्रवादीचेच आहेत. त्यामुळे बँकेच्या स्वीकृत संचालकपदी काँग्रेसच्या येथील निष्ठावंताला संधी मिळाली. विद्याधर गुरबे, राजेंद्र परीट, संजय सावंत, नौशाद बुढेखान या कार्यकर्त्यांना बळ द्यावे.
हे आहेत कळीचे प्रश्न !
हिरण्यकेशी व घटप्रभा खोऱ्यातील पूरग्रस्तांचे पुर्नवसन, गडहिंग्लज व चंदगड तालुक्याच्या पूर्वभागाला हक्काचे पाणी, बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
काँग्रेसच्या विजयात भागीदारी !
गेल्यावेळी संजय मंडलिकांना गडहिंग्लज विभागातून ५२ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. हे मताधिक्य तोडून ८,९३८ मतांची आघाडी शाहू महाराजांना दिली. म्हणजेच, त्यांच्या विजयात सुमारे ६० हजार मतांची भागीदारी ‘गडहिंग्लज’करांनी केली. त्याची उचित नोंद नेतृत्वाने व पक्षाने घ्यायला हवी.