सडोली खालसा : भोगावती साखर कारखान्यात नोकरभरतीसाठी ज्यांनी सभासदांच्या मुलांकडून जमिनी व लाखो रुपयांची माया गोळा केली, त्या राष्ट्रवादी-शेकापच्या लुटारू टोळीला कारखान्यातून हद्दपार करा, असे आवाहन कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी केले. कुरुकली (ता. करवीर) येथे कॉँग्रेसप्रणीत राजर्षी शाहू शेतकरी पॅनेलच्या प्रचारसभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मल्हार पाटील होते. पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्या राष्ट्रवादी-शेकापने गेल्या पाच-सहा वर्षांत कारखाना लुबाडण्याचे काम केले. याउलट आम्ही जिल्हा बॅँक, गोकुळ, दादा बॅँक, राजीवजी सूतगिरणी या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले. भोगावती कारखान्याला गतवैभव आणण्यासाठी सभासदांनी साथ द्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले. किशाबापू किरूळकर म्हणाले, राष्ट्रवादी-शेकापची मंडळी बगळ्यासारखी देखणी व गोंडस वाटतात; पण पाण्यात मासा दिसला की पटकन उचलतात. त्याचप्रमाणे कारखान्यात मिळेल त्या ठिकाणी हात मारण्याचा उद्योग या मंडळींनी केला आहे. कारखाना कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी पी. एन. पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही. ‘भोगावती’वर प्रशासक आला नसता तर यापेक्षा वाईट अवस्था झाली असती, कारखान्याचा कामगार हा सगळ्यांत सुज्ञ आहे. त्यांनी पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पाठिंबा दिल्याचे ‘गोकुळ’चे संचालक अरुण डोंगळे यांनी सांगितले. उदयसिंह पाटील, पी. डी. धुंदरे, बाळासाहेब खाडे, सत्यजित पाटील, राहुल पाटील-सडोलीकर, उदयानी साळुंखे, संजयसिंह पाटील, सर्जेराव पाटील, शिवाजी तळेकर, राजेंद्र सूर्यवंशी, संदीप पाटील-कुर्डूकर, आदी उपस्थित होते. एम. आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले. पांडुरंग पाटील यांनी आभार मानले.‘शेकाप’ कार्यकर्त्यांचा कॉँग्रेसमध्ये प्रवेश‘शेकाप’चे डॉ. दिग्विजय पाटील, दत्तात्रय पाटील, ऋतुराज पाटील, युवराज जयवंत पाटील, वसंत चव्हाण (कांडगाव), आदींनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. पी. एन. पाटील यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले.
नोकरभरतीत माया मिळविणाऱ्यांना हद्दपार करा
By admin | Published: April 16, 2017 11:56 PM