नृसिंहवाडी : शिरोळ तालुक्यात नदी प्रदूषणचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, दूषित पंचगंगा व कृष्णा नदीच्या संगमाजवळील पाणी काळेकुट्ट व दुर्गंधीयुक्त झाले आहे. त्यामुळे मासे मृत्युमुखी पडत असून, पंचगंगेपाठोपाठ कृष्णा नदीही दूषित झाली आहे.
शिरोळ तालुक्याला वरदायी ठरलेली कृष्णा, पंचगंगा या दोन्ही नद्या दूषित बनल्या असून, तालुक्यातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. कोल्हापूर येथील पंचगंगा ही गटारगंगा संबोधली जात असून, पंचगंगेचे पाणी कृष्णेमध्ये मिसळत असल्याने कृष्णा नदीही प्रदूषित होत आहे.
कृष्णा- पंचगंगा नदीच्या संगमावर श्रीक्षेत्र नृसिंहवाडी हे जागृत दत्त देवस्थान आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांतून भाविक याठिकाणी येत असतात. येथील संगमात स्नानदेखील करत असतात; परंतु मंदिरासमोरील व संगम परिसरातील नदीचे पाणी प्रदूषित व दुर्गंधीयुक्त झाल्यामुळे त्यांची अडचण होत आहे. शिवाय येणारे यात्रेकरू विविध खराब वस्तू, निर्माल्य थेट नदीत टाकून प्रदूषण वाढविण्यास हातभार लावत आहेत.
येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थानच्या वतीने मंदिर परिसरातील नदी स्वच्छ करण्यात आली. नदीतील विविध वस्तू, कपडे, निर्माल्य येथील नावाडी कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर- ट्रालीमधून पाठवून निर्गत करण्यात आली आहेत. निवेदने देऊनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना झाल्या नसल्याने जल प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. याबाबत प्रशासनाने वेळीच दखल घेऊन कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करून हा प्रश्न कायमचा मार्गी लावण्याची आवश्यकता असल्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
फोटो - १८०४२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ -
नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील कृष्णा- पंचगंगा संगम पात्रात दूषित पाण्यामुळे मासे मृत झाले आहेत.