राजाराम लोंढे - कोल्हापूर -पंतप्रधानांनी आदर्श सांसद ग्राम योजनेच्या माध्यमातून देशातील गावे विकासात्मकदृष्ट्या मॉडेल करण्याची घोषणा केली. त्यानुसार शाहूवाडी तालुक्यातील पेरीड गाव खासदार राजू शेट्टी यांनी दत्तक घेतले. त्यानंतर शासकीय अधिकाऱ्यांनी बैठका घेऊन समस्यांचा आढावा घेत विकासकामांचे प्रस्ताव तयार केले. मात्र, सहा महिने उलटले तरी विकासकामांचा श्रीगणेशाही झालेला दिसत नाही. बैठकांसाठी येणाऱ्यांच्या स्वागतावर ग्रामपंचायतीचे मात्र सुमारे ५० हजार खर्ची पडल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहेत. त्यामुळे आदर्श गावचा सुरुवातीला असणारा गावकऱ्यांचा उत्साह आता हळूहळू ओसरू लागला आहे. पेरीड या गावचा इतिहासच वेगळा आहे. येथे एकोपा व राजकारणविरहित विकासाची प्रक्रिया राबविली जात असल्याने गाव तसे सर्वच पातळीवर स्वयंपूर्ण आहे. असे गाव खासदार शेट्टी यांनी दत्तक घेतल्याने पेरीड राज्यात निश्चितच मॉडेल बनेल, असा विश्वास साऱ्या तालुक्याला आहे. आता सर्वांच्या नजरा गावच्या विकासाकडे लागल्या आहेत; मात्र सांसद ग्राम योजनेचे स्वप्न ज्या पद्धतीने दाखविले, त्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. गेल्या सहा महिन्यांत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, तत्कालीन जिल्हाधिकारी राजाराम माने, प्रांताधिकारी रवींद्र खाडे, तहसीलदार ऋषिकेश शेळके, नायब तहसीलदार बाजीराव पाटील, गटविकास अधिकारी डॉ. उदय पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी भेटी देऊन गावाची पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी एक बैठक घेऊन गावातील विकासकामांचा प्रस्ताव तयार केला. खासदार शेट्टी यांनीही याबाबत एकदा बैठक घेऊन चर्चा केली आहे. सहा महिन्यांपूर्वी गावच्या असलेल्या समस्या आहे तशाच आहेत. पावसाळा आला तरी विकासकामांचा पत्ता नसल्याने ग्रामस्थांमधून उलटसुलट चर्चा सुरू आहे. सहा महिन्यांत कोणत्याच विकासकामांची सुरुवात झालेली नाही. विविध कामांचे प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत. त्याला मंजुरी देऊन कामांना लवकर सुरुवात व्हावी. - अनिता राजाराम पाटील, सरपंच, पेरीडसांसद ग्राम योजनेत २०१४-१५ या आर्थिक वर्षात निधीची तरतूद नव्हती. २०१५-१६ या वर्षात तरतूद करण्यात येणार आहे. त्यामुळे येथून पुढे प्रस्तावांना मान्यता मिळून कामांची सुरुवात होईल. अधिकाऱ्यांच्या एक-दोन बैठका झाल्या असल्या तरी आम्ही शासकीय पातळीवर सतत संपर्कात आहे.- पी. एन. पाटील, ग्रामसेवक, पेरीडराजू शेट्टी--पेरीड
हारतुऱ्यावरच खर्च सहा महिन्यांत नुसतेच प्रस्ताव
By admin | Published: May 26, 2015 12:14 AM