सांगली : ‘रंगभूमीवरील नाटकांतून विविध विषय समाजासमोर येणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रयोगशील नाटककारांनी आधुनिकतेची कास तर धरली पाहिजेच, परंतु त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांनी विज्ञाननिष्ठ असावे,’ असे मत ज्येष्ठ निर्माते आणि दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी आज (बुधवारी) येथे व्यक्त केले.रंगभूमी दिनानिमित्त येथील अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्यावतीने डॉ. पटेल यांना अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष अरुण काकडे यांच्याहस्ते ‘विष्णुदास भावे पदक’ प्रदान करण्यात आले. भावे नाट्यमंदिरात झालेल्या समारंभात सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. व्यासपीठावर लेखक-अभिनेते अभिराम भडकमकर, आ. सुधीर गाडगीळ, समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे आदी उपस्थित होते. डॉ. जब्बार पटेल म्हणाले, आतापर्यंत ज्यांना भावे गौरव पदक प्रदान करण्यात आले, त्यांची नुसती नावे वाचली तरी मनावर दडपण येते. नाट्यसृष्टीतील अनेक दिग्गजांचा स्पर्श या पदकाला झालेला आहे आणि तो पुरस्कार मिळाल्याने मनस्वी आनंद होत आहे. रंगभूमीवर चारित्र्य ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती प्रत्येक नाट्यकलावंताने जपली पाहिजे. ज्यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येतो, त्या विष्णुदास भावे यांचा जीवनपट अभ्यासला, तर त्यातून खूप काही शिकता येते. भावेंनी नाटकाची सीमारेषा केवळ मराठी या एकाच भाषेकरिता मर्यादित न ठेवता, हिंदी नाटकापर्यंत मजल मारली होती, हे दुर्लक्षून चालणार नाही.’ (प्रतिनिधी)हा तर सांस्कृतिक नेतृत्वाचा सन्मान : भडकमकर डॉ. जब्बार पटेल यांच्या चित्रपट आणि नाटकांच्या पाठीमागे एक पक्की वैचारिक बैठक आहे. त्यांनी ‘थिएटर अॅकॅडमी’ या नाट्यविषयक पर्यावरण बदलणाऱ्या संस्थेची स्थापना केली आणि रंगभूमी ही एक चळवळ असल्याचे सिध्द केले. स्पष्टच बोलायचे तर, डॉ. जब्बार हे आमच्या पिढीचे सांस्कृतिक नेते असून, आजचा होणारा सन्मान हा सांस्कृतिक नेतृत्वाचाच सन्मान असल्याचे मत चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांनी व्यक्त केले.विष्णुदास भावे गौरव पदक, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि रोख ११ हजार रुपये असे भावे गौरव पुरस्काराचे स्वरूप आहे.
प्रयोगशील नाटककार विज्ञाननिष्ठ असावा
By admin | Published: November 05, 2014 11:52 PM