लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील लायकर मळ्यातील जनावरांच्या गोठ्यात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या उत्तम राजाराम चौगले (वय ४६, रा. लायकर मळा, मूळ गाव तिळवणी, ता. हातकणंगले) या कामगाराच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी नजीर रशीद मुल्लाणी (३५, रा. लिंबू चौक) या यंत्रमाग कामगारास अटक करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, उत्तम हे लायकर मळ्यात संजय लायकर यांच्या गोठ्यात काम करीत होते आणि तेथेच राहत होते. त्यांना २९ ऑक्टोबर २०२० ला रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कटरने गळ्यावर वार करून गंभीर जखमी करण्यात आले होते. उपचारादरम्यान ७ नोव्हेंबर २०२० ला त्यांचा सांगली येथील सिव्हील रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून शिवाजीनगर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या संयुक्त पथकामार्फत तपास सुरू होता. याप्रकरणी उत्तम याचे मित्र, नातेवाइकांकडे तसेच मूळ गाव तिळवणी येथे चौकशी सुरू होती. त्याचबरोबर आर्थिक व अनैतिक संबंधातून खून झाला आहे का, याबाबतही पडताळणी करण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, नजीर हा उत्तम यांच्याकडे दारू पिण्यासाठी नेहमी येत होता. अनेकवेळा उत्तम यांनी त्याला उधार दारू पाजली होती. २९ ऑक्टोबरलाही नजीर याने उत्तम यांच्याकडे उधार दारू मागितली. त्यास नकार दिल्याने नजीर याने रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास लायकर यांच्या गोठ्यात झोपलेल्या उत्तम यांच्या गळ्यावर कटरने वार करून पलायन केले होते.
कोणताही धागादोरा नसताना पोलिसांनी खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीतून या गुन्ह्याची उकल केली, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांनी दिली.
फोटो ओळी) १३०१२०२१-आयसीएच-०१ इचलकरंजीत कामगाराच्या खून प्रकरणाचा छडा लावून पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली.
(छाया - उत्तम पाटील)