कोल्हापूर : शहरात वितरित होणाऱ्या पेट्रोल पंपामधून वितरित होणो पेट्रोलमध्ये पाण्याची भेसळ होत असल्याचा प्रकार कोल्हापूर जनशक्ती संघटनेने उघडकीस आणला. यासंदर्भात शिष्टमंडळाने सोमवारी (दि.६) जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. पाणीमिश्रीत पेट्रोलची बाटली पुरवठा अधिकाऱ्यांसमोर ठेवून संबंधित पेट्रोल पंप चालकांवर कारवाई करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी केली.निवेदनात म्हंटले आहे की, काही पंपचालकांच्या पेट्रोल साठवणुकीच्या टाक्यांमध्ये पूर्वीपासूनच पाणी असण्याची दाट शक्यता आहे. त्यातच ग्राहकाला मिळणारे पेट्रोल शुध्द आहे का हे तपासण्याची कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्याचा गैरफायदा घेऊन काही पंपचालक ग्राहकांना लुबाडत आहेत. याकडे प्रशासनाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात इंडियन आॅइल कार्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन, भारत पेट्रोलियम कार्पोरेशन कंपनीचे २५१ इतके पंप आहेत. अन्य काही खासगी कंपन्यांचे पेट्रोल पंपही आहेत. पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळण्याची परवानगी आहे. मात्र, या पेट्रोलमधय्े किती टक्के इथेनॉल मिसळले जाते याबाबत सर्वच अनभिज्ञ आहेत.
काही पेट्रोल पंपांवर इंधन टाकीत पेट्रोल साठविण्यापूर्वीच पाणी असते. त्यामुळे पेट्रोल भरताना पाणीमिश्रित पेट्रोल ग्राहकांना मिळत आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी.
यावर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी संबंधित पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिकारी व वितरकांची बैठक घेऊन खुलासा करण्याची सुचना देऊ, असे सांगितले. शिष्टमंडळात कार्याध्यक्ष समीर नदाफ, राजन पाटील, इकबाल मुल्ला, तुकाराम भालेकर, बाबा वाघापूरकर, गुफरान मणेर, अमोल हंजे आदींचा समावेश होता.
कोल्हापूर शहरात पाणी भेसळयुक्त पेट्रोलची विक्री सुरु असून संबंधित पंपचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी कोल्हापूर जनशक्तीच्या शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांच्याकडे केली.