कोल्हापूर : यंदाचे शैक्षणिक मूल्यमापन आणि नव्या शैक्षणिक वर्ष धोरणाबाबत राज्य शासनाकडून स्पष्ट आदेश द्यावेत, अशी मागणी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या शिष्टमंडळाने केली. त्याबाबतचे निवेदन सहायक शिक्षण उपसंचालक सुभाष चौगुले यांना दिले.
यंदाचे शैक्षणिक वर्ष रद्द केल्यास अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शैक्षणिक वर्ष रद्द न करता ४० : ६० या सूत्राचा वापर करून अर्थात इयत्ता पहिलीचा नवीन वर्ग १५ जूनपासून सुरू करणे. दुसरीच्या वर्गापासून मागील इयत्तेचा सुरुवातीचा ४० टक्के भाग हा मागील वर्षाचा अभ्यास पूर्ण करून घेणे. ६० टक्के भाग हा त्याच वर्गातील अभ्यास पूर्ण करून घ्यावा. दिल्ली सरकारने पहिली ते आठवीच्या सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मूल्यमापन पद्धतीमध्ये आवश्यक बदल करण्याबाबत राज्य शासनाने योग्य ते आदेश द्यावेत, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
या शिष्टमंडळात महासंघाचे राज्य उपाध्यक्ष एम. डी. पाटील, कार्याध्यक्ष संतोष आयरे, विभागीय अध्यक्ष राजेंद्र कोरे, राजाराम संपकाळ, नितीन पानारी, टी. आर. पाटील, एस. वाय. पाटील, अभिजित साळोखे, संतोष पाटील, राज मेंगे, स्नेहल रेळेकर, दशरथ कुंभार, कैलास भोईटे, युवराज गायकवाड यांचा समावेश होता.