कोल्हापूर : आंतरविद्याशाखीय सहकार्यातून साखर उद्योगात गुंतलेल्या विविध प्रवाहांचा वेध आता शिवाजी विद्यापीठ घेणार आहे. यासाठी विद्यापीठाने ‘भारतीय शुगर’ या संस्थेसमवेत गुरुवारी सामंजस्य करार केला. या दोन्ही संस्थांनी सहकार्यवृद्धीच्या दृष्टीने हा करार केला.यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, देशातील साखर उद्योगासमोर अनेक आव्हाने आहेत. त्यांचा ऊहापोह करून या उद्योगाला दिशा देण्याचे काम ‘भारतीय शुगर’समवेत झालेल्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून व्हावे. साखर उद्योग सध्या विविध अडचणींतून जात आहे, हे खरे असले त्यातील व्यवस्थापन आणि गुंतलेल्या अर्थकारणाला योग्य दिशा दिल्यास या उद्योगाचे आणि त्याच्याशी संबंधित शेतकऱ्यांचे भवितव्य उज्ज्वल आहे. भारतीय शुगर संस्थेविषयी संस्थापक-अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे म्हणाले, सन १९७५पासून ‘भारतीय शुगर’ ही साखर उद्योगास आवश्यक प्रशिक्षणादी उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे. भारतासह पाच देशांमध्ये तिचे कार्यक्षेत्र विस्तारलेले आहे. यावेळी सामंजस्य करारावर विद्यापीठातर्फे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी, तर भारतीय शुगरतर्फे विक्रमसिंह शिंदे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. कार्यक्रमास वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, अधिष्ठाता डॉ. पी. डी. राऊत, डॉ. ए. एम. गुरव, अर्थशास्त्र अधिविभागाचे डॉ. विजय ककडे, रसायनशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. पी. एन. भोसले, एम. एस. देशमुख, एस. टी. कोंबडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)उपक्रमांचे वेळापत्रक तयार करा : साखर उद्योगास योग्य दिशा दर्शविण्याचे काम साध्य व्हावे. त्यासाठी पुढील वर्षभरामध्ये राबवावयाच्या विविध उपक्रमांचे वेळापत्रक तयार करून कार्यवाही करावी, अशी सूचना प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांनी यावेळी केली.
साखर उद्योगातील विविध प्रवाहांचा विद्यापीठ घेणार वेध
By admin | Published: April 28, 2017 1:05 AM