जयसिंगपूर : देशातील शिल्लक असलेल्या साखरेतील ४० लाख टन साखर त्वरित निर्यात करण्यात यावी, तसेच साखर उद्योगाला संकटातून सावरण्यासाठी केंद्र सरकारने दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी लोकसभेत केली आहे, अशी माहिती स्वाभिमानी पक्षाच्यावतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.याबाबत खा. शेट्टी म्हणाले, गेल्या तीन-चार वर्षांत साखरेचे दर अधिक ढासळले आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे दर देखील मिळालेला नाही. यामुळे देशातील ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्याचे गंभीर परिणाम बाजारपेठेवरदेखील जाणवत आहे. त्यामुळे देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे देणे २० हजार कोटींहून अधिक आहे. त्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना निदान एफआरपी तर देता यावी यासाठी साखर कारखान्यांना ६००० कोटींचे बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा केली आहे. आज रोजी पेट्रोलियम कंपन्यांना इंधनामध्ये १० टक्के इथेनॉल वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, मागणी आणि पुरवठा यांच्यातील तफावत पाहिली तर साखर कारखाने इथेनॉल निर्मितीमध्ये उत्सुक नाहीत, असे दिसते. देशातील साखर उद्योगाला सावरण्यासाठी केंद्र सरकारला दीर्घकालीन योजना आणण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी त्वरित ४० लाख टन साखर निर्यात करणे जरूरीचे आहे. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या साखरेचा प्रश्न मिटून साखरेचे दर वाढून स्थिर राहण्यास मदत होणार आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले, इथेनॉल निर्मितीवर भर देण्याची आवश्यकता असून, ५० टक्के साखर व ५० टक्के इथेनॉल निर्मिती करणारे साखर कारखाने उभे केले पाहिजेत. तसेच साखरेचा बफर स्टॉक करणे, साखरेचे दर वेगवेगळे करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये घरगुती दर वेगळे व उद्योग धंद्यासाठी लागणाऱ्या साखरेचे दर वेगळे असे दुहेरी किमतीचे धोरण अवलंबावे लागणार आहे. उसापासून मिळणाऱ्या उपपदार्थ वीजनिर्मितीवर भर देण्याची आवश्यकता आहे. यामुळे साखर उद्योगावर आलेले संकट जाण्यास मदत होणार आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
४० लाख टन साखर निर्यात करा
By admin | Published: August 06, 2015 9:44 PM