चंद्रकांत कित्तुरे।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : देशाचे चालू हंगामात ५० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्याअखेर २१ लाख ७४ हजार १६९ टन साखर निर्यातीसाठी बाहेर पडली ैआहे. यातील १७ लाख ४४ हजार टन साखरेची प्रत्यक्षात निर्यात झाली आहे. हंगामाअखेर ही निर्यात ३५ लाख टनांवर जाण्याची शक्यता असून, ती लक्ष्याच्या सुमारे ७० टक्के असेल असा अंदाज आहे.देशातील साखर हंगाम १ आॅक्टोबर ते ३० सप्टेंबर असा असतो. गेल्यावर्षी प्रमाणेच यावर्षीही साखरेचे बंपर म्हणजे ३२६ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता आहे. देशाची गरज २६० लाख टनांची असल्याने अतिरिक्त साखरेचा प्रश्न यंदाही कायम आहे. यावर उपाय म्हणून केंद्राने ५० लाख टन साखरेचे उद्दिष्ट निश्चित करताना साखर कारखान्यांना कोटा ठरवून दिला आहे. मात्र, आंतरराष्टÑीय बाजारातील साखरेचे दरही देशांतर्गत दरापेक्षा कमी असल्याने कारखान्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद नाही. मात्र, अनुदानासाठी निर्यात कोटा पूर्ण करण्याचे बंधन सरकारने घातले आहे. त्यामुळे प्रसंगी तोटा सोसूनही कारखाने निर्यातीचा कोटा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहेत. यामुळेच गेल्या महिन्यात (८ मार्च ते ६ एप्रिल) ६ लाख १३ हजार १९२ टन साखरेची निर्यात झाली आहे, तर १ आॅक्टोबर २०१८ ते ६ एप्रिल २०१९ या काळात २१ लाख ७४ हजार १६९ टन साखर निर्यातीसाठी बाहेर पडली आहे.यातील १७ लाख ४४ हजार २७ टन साखर परदेशात पोहोचली आहे. ४ लाख १३ हजार १४२ टन साखर जहाजांमध्ये किंवा रिफायनरींमध्ये आहे. निर्यात झालेल्या साखरेमध्ये सुमारे आठ लाख टन साखर कच्ची आणि नऊ लाख टन साखर पांढरी (व्हाईट) आहे. आॅल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनने ही माहिती दिलीआहे.भारताची साखर ५० देशांना निर्यातभारताची साखर ५० देशांना निर्यात होत आहे. त्यात बांगलादेशाला सर्वाधिक ३ लाख ५६ हजार ७२८ टन निर्यात झाली आहे. निर्यातीची ही टक्केवारी २०.४५ टक्के आहे. त्याखालोखाल २ लाख ८७ हजार ४९८ टन म्हणजेच १६.४८ टक्के साखर श्रीलंकेला निर्यात झाली आहे. त्यानंतर सोमालिया, इराण, सुदान, आदी देशांचा क्रम लागतो.
साखर निर्यातीचे लक्ष्य ७० टक्के गाठणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:58 PM