कोल्हापूर : भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमध्ये केलेल्या सैन्य कारवाईमुळे सर्वसामान्य जनतेचा ऊर भरून आला. पुलवामा घटनेत ५० जवान शहीद झाले होते. त्याचा बदला भारताने घेतल्याने या कारवाईनंतर कोल्हापुरात नागरिकांनी पेढे, जिलेबी वाटून आनंद व्यक्त केला. अनेक ठिकाणी फटाके वाजवूनही जल्लोष करण्यात आला.
भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमध्ये सैनिकी कारवाई केल्यानंतर मंगळवारी कोल्हापुरातील बिनखांबी गणेश मंदिर परिसरात भारतीय वायूदलाचे अभिनंदन करणारा असा फलक लगेच झळकला.येथील बिनखांबी गणेश मंदिर परिसरात भारतीय हवाई दलाचे अभिनंदन करणारा भला मोठा डिजिटल फलक दुपारीच झळकला. महाद्वार रोडवर व्यापारी, फेरीवाले, सर्वसामान्य नागरिक एकत्र आले व त्यांनी पेढे-साखर वाटून या कारवाईचा आनंद साजरा केला. येथील मध्यवर्ती शिवाजी चौकातही असेच सर्वसामान्य नागरिक एकत्र झाले. त्यांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली व जिलेबीचे वाटप केले. भारतमाता की... जय! अशा घोषणांनी हा परिसर दणाणून गेला.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने पहाटे बिंदु चौक येथे फटाके फोडून, साखर वाटून व भारत माता की जय, वंदे मातरम, भारतीय सेना जिंदाबाद घोषणा देऊन या कारवाईच स्वागत केले.
पुलवामा घटनेत जवान शहीद होऊन आज १३ दिवस झाले; त्यामुळे भाजपने पक्ष म्हणून तातडीने लगेच आनंद किंवा जल्लोष साजरा केला नाही. त्याबद्दल लोकांतून काय प्रतिक्रिया व्यक्त होते याचा आनंद घेण्यात येत होता.