दत्ता पाटील
म्हाकवे (कोल्हापूर): ऊसाचे अर्धा-पाव टन वजन वाढावे यासाठी कुटुंबियांना उन्हातान्हात कांड्या गोळा करायला लागतात. मात्र, साखर कारखानदार सहजपणे एका वाहनामागे दीड ते अडीच टनाची काटामारी करुन कोट्यावधीचा दरोडा घालत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी या साखर चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी एकजूट करावी असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले. चार वर्षात वाढत्या महागाईनुसार ऊसदरात वाढ झालेली नाही अशी खंत व्यक्त करत गतवर्षीचे २०० रुपये कारखानदारांच्या छाताडावर बसून घेवू असा इशाराही शेट्टी यांनी दिला.आणूर (ता. कागल) येथे जागर एफआरपीचा संघर्ष ऊस दराचा या अंतर्गत सभेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच रेखा तोडकर होत्या. यावेळी शेट्टी यांनी शेतकऱ्यांना १५ ऑक्टोबरच्या ऊसपरिषदेचेही शेतकऱ्यांना निमंत्रण दिले. यावेळी संभाजी बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार, सागर कोळी यांनी मनोगते व्यक्त केली.तर मुश्रीफांची मिरवणूक काढली असतीविधानसभेत एफआरपीचे तुकडे पाडताना तत्कालीन मंत्री हसन मुश्रीफ यांनी तोंड उघडले नाही. मात्र, सत्तेतून बाहेर पडल्यानंतर एक रक्कमी देण्याचे सुतोवाच करत आहेत. हेच त्यांनी विधानसभेत बोलले असते तर त्यांची मिरवणूक काढली असती असे म्हणत बाळासाहेब पाटील यांनी मुश्रीफांवर हल्लाबोल चढवला.शेतकऱ्यांना संरक्षण कधी?मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेत वाढ करून झेड प्लस केली. मात्र, रात्री अपरात्री शेतशिवारात जाणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यांच्या संरक्षणाचे काय? असा खणखणीत सवाल अजित पोवार यांनी करताच शेतकऱ्यांनी टाळयांनी दाद दिली.कागलमध्ये ऊसदरात इर्षा का नाही?कागल तालुक्यात वेगवेगळ्या राजकीय गटाचे पाच कारखाने आहेत. राजकारणात जी इर्षा असते. ती ऊसदर देताना का नसते असा सवाल करत आता शेतकरी अडाणी राहिलेला नाही. आम्ही फुकटचे मागत नाही तर घामाचे दाम मागतोय असा इशाराही कोंडेकर यांनी दिला.