कोल्हापूर : पक्षविरोधी कारवाईबद्दल कुरुंदवाडच्या नगराध्यक्षा मनीषा उदय डांगे, गटनेते रामचंंद्र भाऊ डांगे आणि स्वीकृत सदस्य शब्बीर चंदूलाल बागवान यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून गुरुवारी सायंकाळी सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली. पक्षाचे नगरपालिकेतील नवे गटनेते म्हणून सुरेश मल्लू कराळे यांची निवड झाली. पालिकेत पक्षाचे आठ सदस्य आहेत. पक्षाचे नेते आमदार हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. बैठकीला आठपैकी सहा नगरसेवक उपस्थित होते. पक्षाने हकालपट्टी केल्याने या तिघांना विधान परिषदेसाठी मतदान करण्यावर प्रश्नचिन्ह लागले. पक्षातर्फे त्यांना मतदानाचा अधिकार दिला जाऊ नये, अशा हालचाली सुरू आहेत. दरम्यान, गटनेते डांगे यांनी मात्र अशी कारवाई झालेली मला माहीत नसून, मीच सर्व आठ सदस्यांनी पक्षाच्या निर्णयानुसार काँग्रेसला मतदान करावे, असा व्हीप काढणार असल्याचे सांगितले आहे. डांगे यांच्यासह हे तिघेही गेल्या तीन वर्षांपासून पक्षविरोधात काम करीत होते. त्यांना वारंवार समज दिली होती; तरीही त्यांच्यात सुधारणा झाली नव्हती. नगरपालिकेतील विषय समित्यांच्या निवडीसंदर्भात चर्चा करण्यासाठी १४ डिसेंबरला बोलाविलेल्या बैठकीसही हे तिघे अनुपस्थित होते. याबाबत विचारणा करण्यासाठी व विषय समितीच्या निवडीबाबत निर्णय घेण्यासाठी पक्षाची येथील जिल्हा कार्यालयात बैठक झाली. त्यास उपस्थित राहण्याच्या सूचना या तिघांनाही दिल्या होत्या; परंतु ते सायंकाळी सातपर्यंत तरी फिरकले नाहीत. त्यामुळे पक्षशिस्त भंग केल्याच्या कारणावरून त्यांची हकालपट्टी केली. मानसिंगराव महाडिकांसोबत शाहूवाडी तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते मानसिंगराव गायकवाड यांच्या गटाने महादेवराव महाडिक यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. मलकापूर नगरपरिषदेत पक्षाचे आठ नगरसेवक आहेत. सध्या गायकवाड शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील यांच्यासोबत आहेत. विधानसभा व ‘गोकुळ’मुळे आमदार पाटील हे महाडिक यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळेच गायकवाडही महाडिक यांच्या जवळ असल्याचे समजते; परंतु या गटाचे नेते प्रकाश पाटील यांनी मात्र असा निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले. बैठक ऊसदराची; फिल्डिंग मात्र विधान परिषदेची कोल्हापूर : उसाच्या एफआरपीसाठी गुरुवारी बोलाविलेल्या कारखानदारांच्या बैठकीनंतर नेत्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीची जुळणी लावली. उमेदवार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ,‘जनसुराज्य’चे नेते विनय कोरे, प्रकाश आवाडे, संजय मंडलिक यांच्यात ‘गुफ्तगू’ झाले. बैठक शेवटच्या टप्प्यात असताना सतेज पाटील तेथे आले. बैठकीनंतर मुश्रीफ यांनी आवाडे यांच्याशी मतदार कुठे आहेत, याची चाचपणी केली. पत्रकारांना मुश्रीफ माहिती देत असताना सतेज यांनी संजय मंडलिक यांच्याशी चर्चा केली. याचवेळी गडहिंग्लजचे नगरसेवक नरेंद्र भद्रापूर, बाळासाहेब गुरव यांनी विनय कोरे यांची यांची भेट घेतली.
कुरुंदवाडच्या नगराध्यक्षांसह तिघांची ‘राष्ट्रवादी’तून हकालपट्टी
By admin | Published: December 18, 2015 1:15 AM