कोल्हापूर : ॲटो रिक्षाची आयुमर्यादा ठरवल्यानंतर ३१ जुलैपर्यंत दिलेली मुदत संपत आहे. त्यामुळे कोरोनासह सर्व बाबींचा विचार करून जुन्या रिक्षांना पुढील वर्षापर्यंत पासिंगकरिता मुदतवाढ द्यावी, अशी मागणी ॲटोरिक्षा संघर्ष समितीने प्रादेशिक परिवहन अधिकारी डाॅ. एस. टी. अल्वारीस यांच्याकडे सोमवारी केली.
ॲटो रिक्षाची आयुमर्यादा ठरवल्यानंतर महापूर, कोरोनाची पहिली लाट आणि आता दुसरी लाट आली आहे. त्यामुळे रिक्षा व्यावसायिकांचे अर्थचक्र बिघडले आहे. सध्याची मुदत ही ३१ जुलैला संपत आहे. या सर्वांचा विचार करून अशा रिक्षांना पुढील वर्षीच्या ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ द्यावी. रिप्लेसमेंटची मुदत संपल्यानंतर परवाना रद्द करण्याचे धोरण बदलून मिळावे. कारण, लाॅकडाऊनमुळे बदली वाहन हजर करणे शक्य झालेले नाही. बदली वाहन हजर केल्यानंतर परवाना नूतनीकरण करून मिळावा. नवीन संगणक प्रणाली सुरू करण्यापूर्वी मॅन्युअली व टूल्स प्रणालीद्वारे परवाना नूतनीकरण, परवाना हस्तांतरण शुल्क, शुल्क व दंड भरलेले आहे ते ग्राह्य मानावे. शासनाने जाहीर केलेले १५०० रुपयांचे अनुदान रिप्लेसमेंटधारकांनाही द्यावी, अशी मागणी करण्यात आली. या वेळी सुभाष शेटे, ईश्वर चन्नी, शिवाजी पाटील, अरुण घोरपडे, अतुल दळवी आदी उपस्थित होते.