राज्यामध्ये ७ हजार २०० मशिदी, ३ हजार कबरस्तान याशिवाय एक हजार वक्फ मिळकती अशी सुमारे अकरा हजाराहून अधिक मिळकती आहेत. असे असूनही आजपर्यंत मतदार नोंदणीसाठी जनजागृती नसल्याने राज्य वक्फ मंडळाकडे फक्त २०० मतदारसंख्याच नोंद आहे. मंडळावर मतदार होण्यासाठी वार्षिक एक लाख उलाढाल असणाऱ्या संस्थांनी नियमित वार्षिक अहवाल महामंडळाकडे जमा करणे बंधनकारक आहे.
राज्यात असणाऱ्या अकरा हजार वक्फ मिळकतीसाठी सुमारे ५० हजार सभासद असणे आवश्यक आहे; परंतु समाजातील अज्ञानपणाचा फायदा घेऊन ठराविक लोकांची मक्तेदारी टिकावी यासाठी सभासदसंख्या वाढविली नाही. यामुळे समाजात जनजागृती करून मतदार संख्या वाढविणे गरजेचे असल्याने मतदार नोंदणीची मुदत सहा महिने वाढवावी. मतदार होण्याचे निकष बदलावेत, प्रत्येक संस्थांचा मतदार यादीत समावेश करावा, प्रत्येक जिल्ह्यातून एकास महामंडळावर सल्लागारपदी नियुक्ती करावी, वक्फ मिळकतीचे उत्पन्न वाढीसाठी उपक्रम राबवावेत, वक्फ मिळकती भाड्याने देण्याची नवी नियमावली बनवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनावर सादिक जमादार, सलीम ढालाईत, शाकेर पाटील, अरिफ तांबोळी, महंमद महात, अजिम मुल्ला यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.