कोल्हापूर : कुळवाडी, कुलवाडी समाजाच्या क्षेत्रपाहणीसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी मराठा महासंघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक आणि अन्य कार्यकर्त्यांनी याबाबत नेमण्यात आलेल्या उपसमितीचे सदस्य डॉ. दत्तात्रय बाळसराफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या कुलवाडी जातीचे सर्वेक्षण व क्षेत्रपाहणी करण्याकरिता एक उपसमिती बुधवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली आहे. डॉ. दत्तात्रय बाळ सराफ, रोहिदास जाधव, डॉ. सर्जेराव निमसे, संशोधन अधिकारी के. एस. आढे, एन. व्ही. जोशी यांचा या समितीमध्ये समावेश आहे.वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, प्रताप वरूटे-नाईक, डॉ. देविका पाटील, अमित आडसुळे यांनी या सदस्यांची दुपारी भेट घेऊन अपुऱ्या कालावधीत पूर्वसूचना मिळाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील बाराही तालुक्यांतील या समाजाच्या कुटुंबांना माहिती देण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी वाढवून द्यावा, अशा मागणीचे निवेदन दिले.ज्या भागामध्ये कुळवाडी, कुलवाडी जातीचे लोक वास्तव्यास आहेत, अशा ठिकाणी ही समिती जाणार असून, ती आज गुरुवारी कोकणात जाणार आहे. दरम्यान, मधुकर पोटे आर्दाळ, म्हंकाळी चौगुले मेंढोली, संभाजी मनगुतकर आजरा यांनी या समाजातील लोकांनाही इतर मागासचे दाखले देण्यासाठी ग्राह्य धरावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे; त्यामुळे समितीचे सदस्य गुरुवारी आजऱ्यात संबंधितांशी चर्चा करणार आहेत.डॉ. दत्तात्रय बाळ सराफ म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात ज्या पद्धतीने महाराष्ट्रातून ४५ हजार फॉर्म भरून घेतले होते. याच पद्धतीने आता कुळवाडी समाजातील लोकांकडून फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत. हा प्राथमिक दौरा असून, यावेळी चर्चा केली जाईल, निवेदने घेतली जातील. यानंतर संबंधितांकडून राज्यभरातून किमान ५00 फॉर्म भरून घेतले जातील आणि याबाबतचा अहवाल आयोगाकडे सादर केला जाईल.