कोल्हापूर : लाॅकडाऊन काळात रिक्षा व्यवसाय ठप्प होता. याकाळात व्यवसाय नसल्याने वाहने घरीच उभी होती. त्यामुळे हा काळ वगळून किमान १०० ते १४० दिवस विमा मुदतवाढ मिळावी, यासाठी भारतीय विमा नियामक प्राधिकरणकडे ‘आप‘च्यावतीने पाठपुरावा करण्यात आला होता. त्याला यश आले असून, पुण्यामध्ये अशा पद्धतीने वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता कोल्हापुरात हा निर्णय लागू झाल्यास त्याचा फायदा हजारो रिक्षाचालकांना होऊ शकतो.
लाॅकडाऊन काळात किमान तीन महिने रिक्षाचालकांना व्यवसाय करण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे रिक्षाचालकांनी आपली वाहने दारात उभी केली होती. दरवर्षी रिक्षाचा विमा उतरवणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे हजारो रिक्षाचालकांनी तो उतरवला. मात्र, तीन महिने रिक्षा दारात उभी असल्याने याकाळात वाहनाची कोणतीही झीज अथवा अपघात किंवा अन्य नुकसान झाले नाही. त्यामुळे विम्याची मुदत संपल्यानंतरही तीन महिने वाढवून द्यावी, अशी मागणी ‘आप’तर्फे पुण्यातील रिक्षाचालक किरण कांबळे यांनी हैदराबाद येथील भारतीय विमा नियामक प्राधिकरणकडे केली होती. प्राधिकरणने मुदतवाढ देण्यास मंजुरी दिल्यामुळे पुण्यातील हजारो रिक्षाचालकांना फायदा झाला. त्याप्रमाणे कोल्हापुरातील हजारो रिक्षाचालकांना विमा कंपन्यांनी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आम आदमी पार्टी, कोल्हापूरतर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली जाणार आहे.
कोट
लाॅकडाऊन काळात रिक्षाच बंद होत्या. त्यामुळे न वापरलेल्या वाहनांचा विमा कालावधी कंपन्यांनी वाढवून दिला पाहिजे. माणुसकी म्हणून कंपन्यांनी ही बाब मान्य करून हजारो रिक्षाचालकांचे जगणे सुसह्य करावे.
- संदीप देसाई, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र, आम आदमी पार्टी