कोल्हापूर : खासगी शाळांचे ऑफलाईन वेतन काढण्यास मुदतवाढ द्यावी व गणेशोत्सवानिमित्त पगार लवकर व्हावेत, या मागणीचे निवेदन शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांना खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले.राज्याध्यक्ष भरत रसाळे म्हणाले, ‘राज्यातील शिक्षकांचे वेतन शालार्थ प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने होते; पण या ऑनलाईन पद्धतीने वेतन करण्यास अडचण निर्माण झाल्याने शासनाने ऑगस्ट २०१९ अखेर ऑफलाईन वेतन काढण्यास परवानगी दिली होती; पण अद्यापही शालार्थ प्रणाली कार्यान्वित न झाल्याने माहे सप्टेंबरपासूनच्या वेतनाचा प्रश्न निर्माण होणार आहे.
सप्टेंबरमध्ये गणेशोत्सव हा सण तसेच दसरा आणि दिवाळी हे महत्त्वाचे सण येत असल्याने पगार वेळेवर होणे आवश्यक आहे. सबब ऑफलाईन वेतन काढण्यास मुदतवाढ द्यावी’, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या शिष्टमंडळात विभागीय अध्यक्ष महादेव डावरे, पतसंस्थेचे चेअरमन राजेश कोंडेकर, व्हा. चेअरमन कुमार पाटील, शहर सचिव अप्पासाहेब वागरे यांचा समावेश होता.