कोल्हापूर : पुणे पदवीधर मतदारसंघात जून २०२० मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी पदवीधर मतदार नोंदणीची मुदत एक महिना वाढविण्याची मागणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे भाजप व मित्रपक्षाचे पदवीधर मतदान नोंदणी समन्वयक माणिक पाटील (चुयेकर) व भाजपचे कोल्हापूर महानगर उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे यांनी निवेदनाद्वारे केली.निवेदनात म्हटले आहे की, पदवीधार मतदान नोंदणी करण्यासाठी नोंदणी अर्जासोबत पदवी अथवा पदविका प्रमाणपत्र किंवा अंतिम वर्षाची गुणपत्रिका, आधार कार्ड यांची झेरॉक्स प्रत व फोटो, आदींची आवश्यकता आहे. मात्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक झाली.
यावेळी सर्व शासकीय यंत्रणा, विविध पक्ष-संघटनांचे नेते व कार्यकर्ते निवडणूक कार्यालयामध्ये व्यस्त राहिल्याने पदवीधर मतदान नोंदणीमध्ये अतिशय मोठा परिणाम झाला आहे. तसेच या मतदार संघातील पाचही जिल्ह्यांत पावसाचाही परिणाम झाला आहे.
या सर्व बाबींचा विचार करून पदवीधर मतदान नोंदणी व्यापक होण्यासाठी पदवीधर नोंदणीचा कार्यक्रम ६ नोव्हेंबरपासून पुढे एक महिन्यासाठी वाढवून मिळावा. तसेच पदवीधर नोंदणीबाबत जनजागृती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी तुषार भिवटे, प्रकाश पाटील, आदी उपस्थित होते.