लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गवसे (ता. आजरा) येथील आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्यासाठी निविदेला दहा दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे. दोन वेळा निविदा काढूनही त्याला प्रतिसाद न मिळाल्याने स्थानिक राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यातून कारखान्याचे त्रांगडे सोडवले जाण्याची शक्यता आहे.
जिल्हा बँकेने थकीत कर्जापोटी आजरा कारखाना ताब्यात घेतला आहे. कारखान्याकडे १०३ कोटी ७१ लाख ७८ हजार थकबाकी होती. बँकेने कारखान्यातील साखरेची विक्री करून त्यातून ३६ कोटी ४ लाख रुपये वसूल केले आहेत. त्यापोटी कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी जिल्हा बँकेने निविदा काढली होती. मात्र, त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. निविदा भरायची राहू दे, त्याची विक्रीही झालेली नाही. निविदा दाखल करण्याचा शनिवारी अखेरचा दिवस होता. या कालावधीत एकही निविदा दाखल झालेली नाही. काेरोनाचा वाढता संसर्गामुळे निविदा भरण्यात अडचणी आल्याचे बँकेचे म्हणणे आहे.
बँकेने काढलेल्या निविदेला दुसऱ्यांदा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे निविदा दाखल करण्यास दहा दिवसांची मुदत वाढ देण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे. दहा जूनपर्यंत निविदा दाखल करता येणार आहे. या कारखान्याचे राजकीय परिणाम कागल, चंदगड व राधानगरी विधानसभा मतदारसंघांवर पडत असल्याने हा कारखाना सुरू करण्यासाठी नेत्यांनी प्रयत्न सुरू केला आहे. त्यातूनच अनेक पर्याय पुढे येत आहेत.